नेहा



आनंदघराच्या सुरुवातीच्या काळात फक्त तिथ जायचं आणि मुलांसोबत मस्तपैकी गप्पा मारायच्या एवढंच आमचा दिनक्रम होता. लॅपटॉपवर कार्टून बघायची, काही गाणी बघायची, गाणी म्हणायची. ज्यांना यात मजा येत होती ती हे सगळ करताना रमून जायची आणि ज्यांना काही मजा नाही अस वाटायचं ती मात्र त्यांच्या-त्यांच्यात दुसरा काहीतरी खेळ शोधून काढायची किंवा इतरांना त्रास द्यायची. नेहा ह्या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या मुलींपैकी एक.
वय साधारण १०वर्ष, अंगकाठी अगदी बारीक, मळके कपडे, तोंडात कायम विमल आणि हसरे पण सतत काहीतरी खोड्या काढायचा विचार करणारे टपोरे डोळे. नेहा तिथ यायची ते इतरांना त्रास द्यायलाच. कोणालातरी डोक्यावर टपली मारणार. कोणालातरी शिव्या देणार. थोडी चौकशी केल्यानंतर कळाल कि तिला वडील नाहीयेत. आई, ती आणि दोन भाऊ, त्यातल्या एकाच लग्न झालेलं. त्याच्यासोबतच अख्ख कुटुंब राहायचं. नेहा आणि तिचा धाकटा भाऊ आई सोबत पहाटे पहाटे कचरा गोळा करायला जायची ती थेट दुपारीच परत यायची. बाहेरची काम झाल्यावर घरची काम पण तिचा पिच्छा सोडायची नाहीत आणि याचा राग ती सगळ्यांवर काढायची.
शाळा तिने खूप पूर्वीच सोडली होती. कारण विचारल्यावर,”सरने इतक्या जोरात कानाखाली मारली कि अजूनबी आवाज घुमतोय.” अस उत्तर मिळाल.
सुरुवातीचे दिवस गेल्यावर अचानक नेहा आमच्या येऊन बसायला लागली. गप्पा मारायला लागली. दिवसेंदिवस आंघोळ न करणारी हि पोरगी इतरांना बघून आवरून यायला लागली. मन लाऊन अभ्यास पण करायला लागली. अत्यंत त्रास देणारी, व्रात्य वाटणारी नेहा खूप मायाळू, सगळ्यावर प्रेम करणारी आणि इतरांची काळजी घेणारी आहे हे लक्षात यायला लागल.
अभ्यासात तर ती हुशार होतीच पण तिला मनापासून नाचायला आवडायचं. मोठी होऊन डान्सर बनणार अस तिने आधीच जाहीर करून टाकलेलं होत. जर आपल्या आधी हि पोरगी सेंटरवर पोहोचली तर असतील-नसतील तेवढ्या सगळ्यांना गोळा करून हि त्यांना गाण्यावर नाचायला शिकवत असायची. अश्यावेळेस एक जण दोन कट्या घेऊन ढोल वाजवत असल्यासारखा जमिनीवर बडवत असायचा आणि तोंडाने आवाज काढत असायचा. कुणीतरी गाण म्हणत असणार, मध्ये नेहा आणि काही आजूबाजूला तर काही मागे असे अगदी व्यवस्थित उभे राहून नाचतायेत अस चित्र हमखास दिसायचं.
नेहाचा धाकटा भाऊ अर्जुन. सतत अस्वच्छ राहत असल्याने इतर मुल त्याच्या जवळ जायची नाहीत. अर्जुन थोडा बोबड बोलायचा, त्यामुळे इतर आपल्याला हसतील ह्या भीतीने ह्या पोराच बोलण आणखीनच कमी झालेलं. नेहाच्यामुळे अर्जुन देखील आनंदघरात यायला लागला होता. पण अजूनही इतरांसोबत मिसळत नव्हता. आमच्यासगळ्याशी बोलायचा पण इतर मुलांसोबत मात्र मिसळत नव्हता. इतर त्याला सोबत घेऊन फिरायचे ते फक्त त्याची टर उडवायलाच. पण एक दिवस जवळच्या तलावावर पोर पोहायला गेलेली असताना अचानक एक जण बुडायला लागला तेव्हा ह्या अर्जुन मागचापुढचा कुठलाही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली आणि त्याला बाहेर काढला. त्या दिवसापासून अर्जुन सगळ्यांचा हिरो झाला. संध्याकाळी सगळीकडे एकच चर्चा होती. या घटनेनंतर अर्जुनला बराच धीर मिळाला. 
नेहापण हळूहळू स्वच्छ राहायला लागली होती. अभ्यासात रस घेत होती. पण गुटखा खाण मात्र कमी झालेलं नव्हत. याचकाळात संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी आम्ही मुलांच्या फोटोज असलेला एक व्हिडियो बनवत होते. त्याच काम सुरु असल्याने एक दिवस आम्हाला पोहोचायला उशीर झाला. गेल्या-गेल्या जाब  विचारायला ह्या बाई दारात उभ्याच होत्या. खर कारण सांगितल तर म्हणजे तुम्ही खोट बोलताय. मग जर खर असेल तर?” असा प्रतिप्रश्न केल्यावर एका क्षणात,”जर खर असेल तर उद्यापासून एक पुडी कमी खाईन, प्रोमीसअस तिने सांगितल. दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिडियो घेऊन गेल्यवर निघताना नेहा हळूच आमच्याजवळ आली आणि ताई, आजपासून एक पुडी कमी.” अस सांगून गेली. नेहाच्या गुटखा सोडण्याची ती सुरुवात होती. पुढील काही दिवसात तिने पूर्णपणे गुटखा खाण थांबवल होत.
पूर्वी शाळेत जायला अजिबात तयार नसलेल्या नेहाने आता तुम्ही असाल त्याच शाळेत जाऊअस सांगितल होत, आता तिथून तुम्ही जर शाळेत येऊन सांगितल तर शाळेत जाऊ इथपर्यंत ती आली होती. लिहायला वाचायला यायला लागल्याने तिचा आत्मविश्वास वाढला होता. नेहा पुन्हा एकदा शाळेत जायला तयार होती.
एक दिवस सेंटरवर गेल्यावर नेहा दिसली नाही. तेवढ्यात तिच्या मैत्रिणी पळत आल्या. “सर! नेहा गाव सोडून गेली”. कोणालाही न सांगता इतरांप्रमाणे नेहा आणि तिच्या कुटुंबीयांनी एका रात्रीत गाव सोडल होत. आजही ते कुठे याबद्दल ठोस अशी कुठलीच माहिती आमच्याकडे नाही. ती शाळेत गेली कि नाही हा प्रश्नदेखील आजही अनुत्तरीतच आहे.
ता.. हा लेख लिहून तसा बराच काळ निघून गेलाय. पण मागील आठवड्यातच सोमवारी सेंटरवर पोहोचलो तर माझ्यासमोर नेहा.....नेहमीच्या सवयीप्रमाणे मला लगेच येऊन बिलगली....गेला काही काळ ते सुरतच्या पुढील कुठल्यातरी गावात होते. तिथे नेहा, अर्जुन आणि तिची आई एका वीट-भट्टीवर काम करत होते पण आता ते जळगावला परत आलेत. कालच अर्जुन भेटला. जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा त्याला बघितला. पोरगा मोठा झालाय. आता नेहा आणि अर्जुन जळगावलाच राहणार आहेत. गेल्यावर्षभरात नेहाच प्रचंड शैक्षणिक नुकसान झालंय. वाचायची सवय पुरती गेलीये. काही हरकत नाही. पुन्हा एकदा लढायला तयार आहोत. नेहा परत आलीये हेच आमच्यासाठी खूप आहे.

Comments

Popular posts from this blog

आनंदघराचं ग्रंथालय

आनंदघरातली मासिक पाळी अभ्यासक्रमाची सुरुवात..

आनंदघर डायरीज...