Tuesday, 18 September 2018

प्रतीक्षा आणि रोशनी


प्रतीक्षा वय वर्ष ६, एकदम बारीक. मध्यंतरी तिला म्हणालो,’”अशीच बारीक होत राहिलीस तर काही दिवसांनी गायब होऊन जाशील.” अस काही आपण म्हणालो हि तिच्या नेहमीच्या सवयीने होहोहो करून हसणार आणि ताई, सर मला उगीच त्रास देताअशी माझी तक्रार प्रणालीकडे करणार. प्रतीक्षा आणि तिचा ५ वर्षाचा भाऊ, तिच्या आईसोबत पहाटे पहाटे कचरा वेचायला बाहेर पडणार. ते थेट दुपारी परत येणार. मग हि थोडी झोप काढणार आणि संध्याकाळी आनंदघरात येणार. आनंदघराच्या अगदी सुरुवातीपासून येणाऱ्या काही मुला/मुलींपैकी प्रतीक्षा एक.
आनंदघरात आली कि हक्काने येऊन माझ्या मांडीतच बसणार. आल्यापासून निघेपर्यंत नुसती बडबड बडबड. प्रचंड गप्पिष्ट, नुसता टाईमपास. “सरांनी हिला लाडावून ठेवलीयेअसा सगळ्यांचा माझ्यावरचा आरोप. पण पोरगी एकदम हुशार, एकपाठी. संध्याकाळी येताना अगदी स्वच्छ आवरून येणार.इतरांसोबत अजिबात मारामारी नाही करणार, शिव्या नाही देणार. शाळेत आजपर्यंत गेलेली नाहीच. पण जायला प्रचंड उत्सुक.शाळेत का जायचंय अस विचारल तर,”गप्पा मारायला.” हे ठरलेल उत्तर.
प्रतीक्षा आणि तिच्याच वयाची रोशनी म्हणजे आनंदघरातील एकदम फेमस जोडगोळी.
रोशनीला 3 बहिणी आणि एक भाऊ. ५ भावंडात रोशनीचा नंबर तिसरा. रोशनीच्या वेळी दिवस गेलेले असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. यापूर्वी त्यांचे स्वतःचे घर होते. दोन्ही मुलींना शाळेत दाखल केलेलं होते. अचानक एका दिवशी काही कामा निमित्त बाहेर गेलेले असताना तुमच्या नवऱ्याचा जळून मृत्यू झाला असा निरोप आला. सत्य समजून घेण्यासाठी अनेक वर्ष कोर्टाचे खेटे घातल्यानंतर एके-दिवशी कंटाळून तिच्या आईने न्याय मिळेल हा नाद सोडून दिला. याच काळात त्यांचे पुन्हा एकदा लग्न झाले आणि दुसऱ्या नवऱ्यापासून गणेश आणि मानसी अशी दोन मुलं झाली. त्यांचा नवरा भोपाळला राहतो आणि दर ५/६ महिन्यातून एकदा घरी चक्कर मारतो. त्याचे संपूर्ण कुटुंब तिकडेच असते. त्याच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध असल्याने रोशनी, तिची आई किंवा इतर भावंड कधीही भोपाळला गेलेली नाही.
प्रतीक्षा आणि तिच्याच वयाची रोशनी, हे म्हणजे एकदम भारी समीकरण. नेहमी सोबत असणार. रोशनीला देखील एक लहान भाऊ आणि हे दोघदेखील त्यांच्या आईसोबत प्रतीक्षा आणि तीच कुटुंब जिथे कचरा वेचायला जातात तिथेच जाणार. प्रतीक्षा जेवढी गप्पिष्ट, रोशनी तेवढीच लाजाळू. पण जर ह्या दोघी एकत्र आल्या तर मात्र कोणालाच सोडत नाहीत. या दोघींचे किस्से आमच्याकडे एकदम फेमस.
एक दिवस प्रतीक्षा पोरगी खूप गंभीरपणे प्रणाली कडे आली आणि तीला म्हणाली, “ताई, सरले कधी दारू नको पी देजा. दारू पिली हि माणूस येडा होई जातो.” अस अचानक काय झाल विचारल असता आदल्या दिवशी तिच्या वडिलांनी दारू पिऊन या दोन्ही पोरांना पट्ट्याने मारल होत आणि त्यांच्यासाठी हे रोजचच होत. या छोट्याश्या पोरीची दारू बद्दलची समज थक्क करून सोडणारी होती / आहे.
याचनंतर काही दिवसांनी मी बरेच दिवस एका कामानिमित्त जळगावच्या बाहेर गेलो होतो. परत आल्यानंतर पहिल्याच दिवशी हो पोरगी गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे आली आणि मला म्हणाली,”सर ताईले इतके रोज एकटे सोडून नको जात जा.”
काही दिवसापूर्वी अचानक हिच्या मानेवर पाठीमागच्या बाजूला गाठी लागल्या. तिने आम्हाला दाखवल्या. तिच्या आईशी याविषयी चर्चा केली. त्यांनी सांगितल कि अश्याच गाठी पूर्वीपण आल्या होत्या पण मग त्या आपोआप नाहीश्या झाल्या. आधीच्या गाठी दुखायच्या नाहीत. यावेळी मात्र त्या दुखत होत्या. आमच्याएका हितचिंतकाने आम्हाला ताबडतोब जळगावातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ञांशी गाठ घालून दिली. त्यांनी तिला तपासलं. सुरुवातील त्यांना त्या गाठी टीबीच्या वाटत होत्या. मेडिकल चेकउप केल्यानंतर मात्र त्या गाठी सध्या असून, हानिकारक नाहीत असा निष्कर्ष निघाला आणि आमच्या सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.
प्रतीक्षाला गाणी म्हणायला खूप आवडत. सगळी गाणी हिची तोंडपाठ. तिला विचारल तर म्हणजे मी ड्यॅन्सर होणार.” “पण अग ड्यॅन्सर म्हणजे नाचणारा तुला तर सिंगर म्हणजे गाणार ह्यायचय ना?” तर म्हणे हो, तेच ते.”
यावर्षी जेव्हा आम्ही सगळ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी पालकांना भेटून बोलत होतो. पण इतरांची प्रतिक्रिया फारशी सकारात्मक नव्हती. पण पोरींना शाळेत टाकायचंय  अस सांगणाऱ्या फक्त प्रतीक्षा आणि रोशनीची आईच होत्या. ठरवल्याप्रमाणे आम्ही या दोघींना पहिलीत आणि यांच्या भावांना बालवाडीत दाखल केल. संध्याकाळ पर्यंत प्रतीक्षा आणि रोशनी आता शाळेत जाणार हि बातमी अख्ख्या कॉलोनीत पसरली. पहिल्याच दिवशी अत्यंत झोकात या पोरी शाळेत गेल्या आणि उड्या मारतच परत आल्या. यांना पाहून बाकीचे पालक संध्याकाळीच आम्हाला भेटायला आले आणि आधी लक्षात नाही आल, पण आपल्यापण पोरींना शाळेत टाकायचं. तुम्हीच सांगा कुठल्या शाळेत टाकू.” अस सांगितल. प्रतीक्षा आणि रोशनीमुळे यावर्षी आम्ही तब्बल १६ मुला/मुलींना शाळेत दाखल करू शकलो,यांपैकी काही जण पहिल्यांदाच शाळेत गेले तर ज्यांनी शाळा सोडली होती ते देखील परत शाळेत जायला तयार झाले.
प्रतीक्षा शाळेत जायला लागल्याचा दुसरा अनपेक्षित फायदा असा झाला कि त्यांचे वडील जे पूर्वी काही कामधंदा न करता फक्त घरी बसून दारू प्यायचे, ते कामाला लागले. संध्याकाळी दारू पिऊन परत येतना दिसणारे तिचे वडील आता घरासाठी भाजी-पाला घेऊन येताना दिसतात, त्यावेळी प्रतीक्षा इतकाच आनंद आम्हाला देखील होतो.
नुकत्याच शाळेत झालेल्या स्नेहसंमेलनात रोशनीने ३ स्पर्धेमध्ये बक्षीस जिंकली. संध्याकाळी उड्या मारतच हि पोरगी तिला मिळालेलं प्रशस्तीपत्रक दाखवायला घेऊन आली होती. आज प्रतीक्षा, समाधान, रोशनी आणि गणेश असे सगळे दररोज शाळेत जातायेत. कचरा गोळा करणारे हात आता शाळेत प्रशस्तीपत्रक गोळा करतायेत.

No comments:

Post a Comment