कल्पनेहूनही कठीण वास्तव….
सिसीफसची दंतकथा आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. सिसीफसला एक शिक्षा देण्यात आली होती. त्या अंतर्गत त्याला दररोज एक मोठा दगड ढकलत-ढकलत डोंगरावर घेऊन जायचा असतो. दररोज भल्या पहाटे Sisyphus हा दगड डोंगरावर ढकलायला सुरुवात करत असतो. दुपार होईपर्यंत Sisyphus ज्यावेळी डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो त्याचवेळी त्याच्या शिक्षेच्या दुसऱ्या भागाची सुरुवात होत असते. ज्या क्षणी Sisyphus दगडावरचा हात सोडतो त्याचक्षणी तो दगड पुन्हा एकदा त्या डोंगरावरून घरंगळत पायथ्याशी येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी Sisyphus पुन्हा एकदा दगड लोटायला सुरुवात करतो. कधीही अंत नसलेली अशी ही शिक्षा होती.
ही काल्पनिक कथा असली तर आजच्या काळात आपल्या अवती-भोवती असे अनेक Sisyphus प्रत्यक्ष आपल्या शहरात,गल्लीत फिरत असतात, फक्त आपलं त्यांच्याकडे लक्ष नसतं इतकंच आणि आपण त्यांना Sisyphus म्हणून नाही तर कचरा वेचणारे, वेठबिगारी करणारे, हातमजुरी करणारे म्हणून ओळखतो. हातावर पोट असलेली ही लोकं.
कचरा वेचक समुदायाशी माझा पहिला संबंध आला ज्यावेळी जळगावातील वासंती दिघे मॅडम याच्या मदतीने आम्ही शहरातील कचरा वेचकांचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.
मुळात सामाजिक प्रश्नांवर काम करताना बहुतांश लोकं केवळ भावनिक आवाहनावर अवलंबून असतात असंच कायम दिसतं. समाजातील एक घटक किती दीन – दुबळा आहे असं चित्र निर्माण करत त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण करायची आणि मग आम्हीच त्यांचे तारणहार अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करायचंच काम अनेक जण करताना दिसतात. मात्र मला आणि प्रणालीला कायमच सहानुभूती पेक्षाही सहवेदना जास्त महत्वाची वाटली.
स्वतःची वाट निवडताना प्रेरणास्थानी असलेलं गडचिरोलीतील अत्यंत शिस्तबद्ध आणि शास्त्रोत पद्धतीच डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग याचं काम. समस्येचा परिपूर्ण अभ्यास करून, समाजासाठी काय गरजेचं आहे हे ठरवण्यासाठी ‘म्हणजे काय आणि कसं मोजणार’ हा मंत्र देणारं ‘निर्माण’ या सगळ्यांच्या प्रभावामुळे सामाजिक प्रश्नांवर केवळ भावनिक आवाहन न करता, समस्येचा सगळ्या बाजूने अभ्यास करत - विविध पैलुंना समजून घेत अभ्यासपूर्ण उपाययोजना करायच्या ह्या हेतूने आम्ही ‘वर्धिष्णू’ ची सुरुवात केली.
याच काळात जळगावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे यांनी जळगावातील ‘कचरा-वेचक समुदायाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण’ करण्याची कल्पना मांडली. हा सामाजिक अभ्यास आमचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारा आहे अशी त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती.
त्यामुळे पहिला प्रश्न होता तो म्हणजे कचरा वेचणारे मिळतील कुठे? एक माहिती होतं की खांद्याला एक पिशवी अडकवून भल्या पहाटे घरातून बाहेर पडतात. दिवसभर शहरातील विविध भागात, रस्त्यांवरून, कचरापेटीतला कचरा शोधत फिरतात. त्यामुळे आम्ही पण सकाळी साधारण ४:३० / ०५:०० वाजता आमचे सर्वेक्षणाचे फॉर्म घेऊन बाहेर पडायचं आणि एखादा कुणी दिसला की त्यांना थांबवून माहिती भरून घ्यायला आम्ही सुरुवात केली.
काही दिवस गेल्यावर कुणीतरी आम्हाला सांगितल की जळगावातील सिंधी कॉलनी येथील गुरुद्वाऱ्यासमोर सकाळी साधारण ६ वाजता लोकांना नाश्ता आणि चहा दिला जातो त्यामुळे तिथे अनेक रस्त्यावर राहणारी, कचरा गोळा करणारी लोकं जमा होतात. मग आम्ही पण दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचलो. लोकांसोबत नाश्ता खात, गप्पा मारत माहिती गोळा करायला सुरुवात केली.
कचरा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात उपेक्षित गट म्हणून या गटाकडे बघितल जातं. शहरातील लोकांना त्यांची घरं, रस्ते साफ तर हवे असतात मात्र हे साफ कोण करतं याविषयी त्यांना फारसे घेणं - देणं नसतं. त्यांना कचरापेटीत आकंठ बुडालेला एखादा छोटा मुलगा पाहून वाईट तर वाटतं पण कोण हे लोक? कसे जगत असतील हे? काय प्रश्न भेडसावत असतील यांना? आपण २ मिनिट देखील सहन करू शकत नाही अशा घाणीत आणि वासात कसे काम करत असतील हे? असे प्रश्न मात्र पडत नाहीत.
कचरा वेचकांकडून विकत घेतलेला कचरा भंगारवाले उच्च दरात कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना विकतात. हे कारखाने त्या मालावर प्रक्रिया करून पुनरुत्पादित केलेला माल आणखी चढ्या किमतीत विकतात. हे व्यावसायिक या कचऱ्यावर मालेमाल तर होतात मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून जीवन जगणारा हा कष्टकरी समाज मात्र नेहमी उपेक्षितच राहतो.
वय वर्ष ६ ते अगदी ६० वयाचे मुलं-मुली, तरुण-तरुणी, म्हातारी माणस कचरा गोळा करण्याचं काम करतात. याच दरम्यान एका छोट्या मुलाला मी भेटलो. ९/१० वर्षाच्या त्या मुलाच्या हाताला कापडाची पट्टी बांधलेली होती. जखम जरा खोल वाटत होती. “काय झालं रे?” विचारल्यावर “काल कुत्रं चावलं.” असं उत्तर मिळालं. मी हादरलोच. त्याला म्हणालो “मग दवाख्यान्यात गेला होतास की नाही?”. तर त्यावर उत्तर “नाही” असं होतं. पुढचा बराच वेळ मी त्याच्यासोबत त्याला दवाख्यान्यात घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने समजावत राहिलो पण त्याचा काही परिणाम झाला नाही. “कुत्र्याचं काय घी बसलेत, आठी साप चावीसन लोकं मरी जाता तरी कोनाले काई घेनदेन नस्त.” कुणीतरी मला सांगत होतं.
लोकांशी बोलताना हळू हळू आम्हाला जळगावातील विविध वस्त्यांची माहिती मिळत होती. त्यामुळे पुढील टप्यात आम्ही आता वस्त्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला.
डम्पिंग ग्राउंडवर २ वर्षाची मुलगी कुठे रांगत जाऊ नये म्हणून त्याला एका स्वच्छ ठिकाणी झाडाला साडीने बांधून ठेवणाऱ्या चंदाताई मला इथेच भेटल्या. सिव्हील हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिल्यावर बेडच्या आजूबाजूला पसरलेले रक्त आणि घाण स्वतःच साफ करणाऱ्या मायाताई इथेच होत्या. “आमना नातेवाईकाले मालूम नई, आमी काय काम करतत ते.” असं सांगणाऱ्या वैसूताई पण इथल्याच. “लोकं येता, अन माहिती घी सन चालले जाता. पुढ कायबी होत नई.” बहुतांश लोक त्यांच्या मनातली सल बोलून दाखवत होते.
आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की ही फक्त कचरा वेचणाऱ्या समुदायाची गोष्ट आहे. पण ही फक्त कचरा वेचक समुदायची गोष्ट नव्हती तर वस्त्यांमध्ये राहणाऱ्या, वेठबिगारी - हातमजुरी करणाऱ्या, स्वच्छता कर्मचारी म्हणून, शाळा-कॉलेज ऑफिसेस मध्ये स्वच्छतागृहाची साफ-सफाई करणाऱ्या, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या या सगळ्यांचीच ही गोष्ट होती. झोपडवस्त्यांमध्ये राहणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या सगळ्यांची ही गोष्ट होती.
निरक्षरता, सतत अस्वच्छ वातावरणात राहण्याने निर्माण होणारे आरोग्याचे गंभीर प्रश्न, अपुरा पैसा आणि व्यसनं यामुळे दैनंदिन जीवनात असंख्य समस्यांना केवळ कचरा वेचक समाजच नाही तर झोपडवस्त्यांमध्ये राहणारी सगळीच लोकं सतत तोंड देत होती. निरक्षरता, अल्प उत्पन्न, व्यसनांवर होणारा भरमसाट खर्च, शासनाचं दुर्लक्ष, वाढती महागाई, वाढता खर्च आणि तो भागवण्यासाठी सतत काढलेले कर्ज याच्या ओझ्याखाली पिढ्यानपिढ्या दबल्या गेल्या आहेत.
वस्त्यांमध्ये जाऊन लोकांशी त्यांच्या दारात बसून गप्पा मारताना एक वेगळच जग माझ्यासमोर उलगडत होतं. असं जग ज्याच्याशी माझा कधी संबंधच आला नाही. माझं संपूर्ण बालपण, शिक्षण जळगावात झालं मात्र तरीही जळगावातील वस्त्यांशी माझा कधी संबंध आला नाही. घर, मित्र, शाळा, कॉलेज या प्रचंड सुरक्षित चौकटीत मी मोठा झालो. पण आता मी अनुभवत असलेलं वास्तव खूप वेगळं होतं. या वास्तवानं मला आतून बाहेरून हादरवून टाकलं. पण ही फक्त एक सुरुवात होती…
अद्वैत फार जीवघेणे आहे सगळे.. चांगले मांडले आहे तू या ब्लॉग मधुन.
ReplyDeleteThank you so much Madam.
Delete