प्रश्न आणि प्रश्न

 प्रश्न वस्तीतले…

आम्ही जळगावातील एका वस्तीत काही माहिती गोळा करण्यासाठी फिरत होतो. दुपारची वेळ होती. अचानक बाजूच्या घरातून आरडाओरडा सुरु झाला. इतरांसाठी ही कौटुंबिक भांडणं हा कायमचाच भाग, पण आमच्यासाठी मात्र हे सगळचं नवीन होतं. थोड्याच वेळात घरात भांडणारे नवरा - बायको बाहेर आले. त्या ताईच्या हातात एक तान्ह बाळ होतं. नवऱ्याने प्रचंड दारू पिलेली होती. अचानक त्याने तिच्या हातातलं ते बाळ हिसकावून घेतलं आणि जमिनीवर फेकून दिलं. आता आजूबाजूचे लोकं त्याला पकडायला आणि बाळाला सांभाळायला धावले. काय घडतंय हे न समजण्यापलीकडे गेलेले आमचे पाय मात्र तिथेच थिजून गेले. सुदैवाने बाळाला काही झालं नव्हत. समाजातल्या या दुसऱ्या काळोख्या बाजूशी आमची पहिली ओळख होत होती.

मुलांसोबत काम करायला सुरुवात करून काही दिवस झाले होते. आम्ही मुलांना शिकवत होतो आणि अचानक आनंदघरातला एक चिमुरडा धापा टाकतच आनंदघरात आला. प्रचंड रडत,’दादा लवकर घरी चाला. माह्या-बाप मायले मारी राहिलाय.’ त्याच्या बोलण्यात जी भीती होती ती बघून आम्ही पळतच त्याच्या घरी गेलो. आम्ही येतोय याची चाहूल लागलेला त्याचा बाप घरातून निघून गेला होता. त्या छोट्या आठ बाय आठ च्या खोलीत सगळीकडे हैदोस मांडल्याची चित्र दिसत होती. पाण्याचा माठ फोडून टाकला होता आणि त्याच पाणी सगळीकडे पसरल होतं, भांडी फेकून दिलेली होती, कपड्यांची उलथापालथ झालेली होती. एका कोपऱ्यात त्याची आई आणि ९ वर्षाची बहिण रडत बसलेल्या होत्या. आम्ही त्यांच्या जवळ गेलो. प्रणाली त्या ताईंशी बोलत होती तर मी त्याच्या बहिणाला समजावत म्हणालो, ‘ बेटा तू आनंदघरात जा, आम्ही इथे तुझ्या आईजवळ थांबतो.’ पण ती अजिबात तिच्या आईला सोडायला तयार नव्हती. आईला मारलेली मिठी अजिबात कमी झालेली नव्हती. ‘काय झालंय बेटा?’ विचारल्यावर तिने हाताची मुठ उघडून एक कागद माझ्या हातात दिला. शाळेत जायला आणि लिहायला-वाचायला लागेलेल्या आपल्या ९ वर्षाच्या मुलीकडून आईने स्वतःची सुसाईड नोट लिहून घेतली होती. 

या सगळ्या घटनेत तिच्या मनावर काय परिणाम झाले असतील याची कल्पना देखील करवत नाही. तिच्या बालमनावर एक कायमची खोल जखम मात्र ती घटना नक्कीच करून गेली होती.

प्रश्न समाजातले..

नेहा, योगिता कचरा वेचायला गेलेल्या असताना एका गृहस्थाने खायला देतो म्हणून घरात बोलावल आणि दोघींना मारहाण केली. कारण काय? तर ह्यांनी घ्या ‘गृहस्थांच्या’ आवारातील वस्तू चोरल्या असा यांना संशय होता. केवळ संशयावरून या माणसाने पोरींच्या हातावर ब्लेड मारून जखमा केल्या होत्या. 

दुसऱ्या एका घटनेत एका स्वीटमार्ट वाल्याने खायला मागायला आलेल्या मुलीचा राग येऊन तिला गरम तेलातला मोठा झारा फेकून मारला होता. या घटनेत त्या मुलीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती.

अश्या एक नाही तर अनेक घटना आहे. या घटना मानसिक विकृती वर तर बोट ठेवतातच पण त्याचवेळी एक समाज म्हणून बालमजुरीकडे बघण्याच्या आपल्या दुहेरी वागण्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आर्थिक दुर्बल घटकातुन येणारी मुलं हि भांडखोर असतात, ती चोरी करतात, खोटं बोलतात, शिव्या देतात, मारामाऱ्या करतात, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवता येत नाही असा एक समजच बहुतांश समाजाने करून घेतलेला आहे आणि मग मुलांना कायम या दृष्टीकोनातूनच बघितलं जातं. 

प्रश्न शाळेतले

‘सरने इतक्या जोरात कानाखाली मारली कि आजबी आवाज घुमी रह्याय्ना.” असं आमच्या इथला एक चिमुरडा सांगायचा. नंतर ज्यावेळी आनंदघरात आरोग्य शिबिरं सुरु झाली त्यावेळी लक्षात आलं कि त्याच्या कानाच्या पडद्याला जखम झाली आहे. 

अगदी सुरुवातीच्या काळात एका प्रतिथयश शाळेने आनंदघरातील मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची तयारी दाखवली. आम्हाला अत्यंत आनंद झाला. मुलांची येण्या-जाण्याची सोय करतो असे म्हणताच मात्र,’त्याची गरज नाही. मुलांना तुमच्याकडेच ठेवा. नाव फक्त आमच्या शाळेत द्या. त्याच काय आहे न आमची शाळा खूप ‘स्वच्छ’ असते तुमची मुलं येतील आणि उगाच घाण करतील.” असे उत्तर मिळाले. सर्वसमावेशक समाजाची आम्हाला अपेक्षित असलेली व्याख्या हि नाही, मुलांना शाळेत यायला मोकळ्या मनाने परवानगी देणार असाल तरच नाव देतो असं ठणकावून सांगितल्यावर मुलांना शाळेत दाखल करून घेतले गेले नाही हे काही वेगळे सांगायला नको.

समजा शाळेत जायचं ठरवलच तर; “कितीबी लवकर गेलं तरी आम्हाले आखरी रांगेत बसवता.”, “खोली साफ करण्याच्या टाइमाले झाडू आमच्याच हातीमंधी देता.” “तुमच्या अंगाले गहिरा गंधा वास येतो असं बोलूंसन इतर पोर आम्हाले चिडवता.” ह्या तक्रारी आम्हाला कायम मुलांनी सांगितल्या आहेत. लिहिण्या-वाचण्याची अडचण हा मुद्दा देखील यात खूप महत्वाची भूमिका पार पडतो मात्र याबद्दल आपण सविस्तर पुढे बोलणारच आहोत. अर्थात याला अपवाद देखील असतातच आणि या मुलांप्रती प्रेम, आपुलकी, सहवेदना असणाऱ्या शाळांनी पुढच्या टप्प्यात आनंदघराला मनापासून मदत केली.

वर्धिष्णूचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण

वर्धिष्णूच्या माध्यामतून केलेय सामाजिक आर्थिक सर्वेक्षणात आम्ही ५ ते १४ वयोगटातील साधारण १२५ लहान मुला-मुलींशी बोललो. यातील ९०% मुलं-मुली यापूर्वी कधीही शाळेत गेलेलो नव्हते किंवा त्यांनी वयाच्या एका टप्प्यावर शाळा सोडलेली होती. सतत अस्वच्छ वातावरणात काम केल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर होते. हाता-पायांना होणाऱ्या जखमा तर नेहमीचीच बाब होती पण त्यासोबतच त्वचेचे रोग, टी.बी. देखील मुलांच्या सोबतीला होते. या १२५ पैकी ७०% मुला-मुलींनी मान्य केलं कि त्यांना किमान गुटख्याचे तरी व्यसन आहे. ही ७०% मुलं-मुली एकत्रितपणे त्यांच्या व्यसनावर दर महिन्याला जवळपास रु. २०,०००/- खर्च करत होते. 

हा प्रश्न एकट्याचा नाही…

वस्तीतलं हे वातावरण, मुलाचं आयुष्य, हिंसा, लहान वयापासूनच व्यसनाच्या आहारी जाणं, समाजाकडून कायमच मिळणारी हेटाळणीपूर्ण वागणूक, त्यांना ज्या प्रश्नांना सामोरं जाव लागत ते सगळच माझ्यासाठी नवीन होत. आपल्या समाजाच्या एका अंधाऱ्या बाजूशी माझी ओळख होत होती. एक अशी बाजू जी कदाचित यापूर्वी कधी माझ्यासमोरच आली नव्हती किंवा आली असली तरी कायम दुर्लक्षितच राहिली होती.   

वर्धिष्णूच्या कामाची सुरुवात जरी कचरा-वेचक समुदायाच्या सामाजिक आर्थीक सर्वेक्षणातून झाली तरी लवकरच आमच्या लक्षात आलं कि हे प्रश्न केवळ कचरा-वेचक मुलांपुरतेच मर्यादित नाही. जर एखादं मुलं समान सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतून येत असेल तर त्याच्यासमोरच प्रश्न जवळपास सारखेच असतात. त्यामुळे जर मुलांचे प्रश्न सारखे असतील तर कदाचित उत्तर देखील सारखंच असू शकतं असा विचार आमच्या मनात आला आणि वर्धिष्णूच्या कामाची दिशा ठरायला सुरुवात झाली.



Comments

Popular posts from this blog

हे फोटोज का महत्त्वाचे आहेत????

आनंदघराचं ग्रंथालय

Why do these photos matter the most???