आनंदघर डायरीज...
तुमच्या नजरेसमोर एका ६ वर्षीय मुलीचा चेहरा आणा. पहाटे ०४:०० - ०४:३० वाजता तिचा दिवस सुरु होतो ज्यावेळी तिची आई तिला स्वयंपाकात मदत करण्यासाठी उठवते. कारण ५ वाजता त्यांना घराबाहेर पडायचं असत. खांद्यावर एक पिशवी घेऊन त्या दोघीही घराबाहेर पडतात. त्यानंतर साधारण ७/८ त्या शहरातल्या विविध रस्त्यांवर कचरा-पेट्यांमध्ये त्या जगणं शोधत फिरतात. तिथेच एखादी जागा शोधून ते बांधून आणलेलं, थंड झालेलं अन्न त्या खातात. साधारण २ वाजता घरी येण्यापूर्वी अनेकदा त्या मुलीच्या हाता-पायांना कचऱ्यातील टोकदार वस्तूंमुळे जखमा खालेल्या असतात किंवा खरचटलेलं असत. अनेकदा रत्यावर कचरा-पेटीत, डम्पिंग ग्राउंडवर कुत्र्यांपासून पळाव लागतं. कधीतरी कुणीतरी चोरी करायला आलेत का असा संशय घेऊन ओरडत, शिव्या घालत, कधीतरी हात देखील उगारत. घरी आल्यावर (कधीतरी) हात-पाय धुवायचे आणि गल्लीतल्या इतर मुला-मुलींसोबत बाहेर हिंडायला पडायचं. त्या मित्र-मैत्रिणींपैकी अनेक जण आता गुटखा खायला लागलेले असतात. काही जणांनी गंमत म्हणून सिगारेटचा कशपण मारलेला असतो. ती संध्याकाळी घरी येते तोपर्यंत वडील कामावरून परतलेले असतात, येता येता वाटेत त्यांनी २ पेग देशी दारूचे मारलेले असतात. वडिलांच्या शिव्या ऐकत, मार खात झोपून जायचं पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:०० वाजता उठण्यासाठी….
हि एका मुलीची गोष्ट नाहीये. २०११सालच्या जणगणनेनुसार संपूर्ण भारतातील १ कोटीहून अधिक मुलं-मुली हि बाल-मजुरीच्या दुष्ट चक्रात अडकेलेली आहेत. मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थांच्या मते कि संख्या ४ कोटी हून अधिक आहे. हि मुलं रस्त्यावर कचरा गोळा करतात, चहाच्या टपरीवर / भेळ-पाणीपुरीच्या / चायनीजच्या गाडीवर काम करतात, बांधकामाच्या ठिकाणी विटा वाहतात, गल्लोगल्ली पेपर - दुध वाटतात, शेतात शेत-मजूर म्हणून काम करतात, वीट-भट्टीवर काम करतात. यातील बहुतांश मुलं हि आर्थिक दुर्बल घटकातून येतात.
शालेय शिक्षणापासून दूर, आरोग्याच्या गंभीर प्रश्नांना सामोरे जाताना, अत्यंत लहान वयात व्यसनाच्या आहारी जातात. घरात, वस्तीत, कामाच्या ठिकाणी हिंसेला सामोरे जातात. शाररीक, लैगिक शोषणाला बळी पडतात. बाल-मजुरीच्या सोबतच मग बाल-विवाह, अत्यंत कमी वयात आलेलं गर्भारपण, अकाली नवऱ्याचा झालेला मृत्यू किंवा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडण. त्यातून वाचलेच तर माहेरी येऊन त्या लहान जीवाला सांभाळत जगण ह्या पलीकडे जीवन त्यांना माहितीच नाही.
सुरक्षित आणी आनंददायी बालपण हा सगळ्या मुलांचा हक्क आहे मात्र या करोडो मुलांसाठी मात्र ते कोसो दूर असलेलं, विरून गेलेलं एक स्वप्न आहे. त्यांच्यासाठी अश्या हक्काच्या जागाच नाहीत जिथे ते व्यक्त होऊ शकतील, स्वप्न रंगवू शकतील आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करू शकतील. त्याच्याकडे अशी लोकंच नाहीत ज्याच्यासोबत ते त्यांचा दिवस कसा गेला हे सांगू शकतील. जे त्यांना “मोठं होऊन काय बनायचंय रे तुला?” असं विचारतील. जे त्यांच्याकडे संशयाने न बघता विश्वास ठेवतील.
२५ जून २०१३साली आम्ही एक स्वप्न बघितलं ’.. आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलांसाठी शिकण्याच्या, व्यक्त होण्याच्या, विचार करण्याच्या, सगळ्यात महत्वाच म्हणजे सुरक्षित आणि आनंददायी जागा निर्माण करण्याचं…त्या स्वप्नाला आम्ही नाव दिलं ‘वर्धिष्णू’...त्यानंतर काही महिन्यातच त्या जागांना देखील एक नाव मिळालं, मुलांनीच दिलेलं…’आनंदघर’... बघता बघता त्याला १० वर्ष पूर्ण होत आहेत… येत्या २५ जून २०२३ला वर्धिष्णूच्या स्थापनेला १० वर्ष पूर्ण होतायेत..त्याचीच हि गोष्ट…
हि गोष्ट आहे त्या १० वर्षांची…हि गोष्ट आहे वर्धिष्णूची आणि आनंदघराची…हि गोष्ट आहे आनंदघरातल्या चिमुरड्यांची, शिकवणाऱ्यांची.. इथल्या प्रत्तेक जण वेगळा आहे, प्रत्तेकाच काहीतरी वैशिष्ट आहे, प्रत्तेकाची वेगळी कथा आहे. पण कुठल्याच कथेला तसा रूढार्थाने शेवट नाही. काही कथा तर आत्ता कुठे सुरु होतायेत. दहा वर्षे म्हणजे तसा काही फार मोठा काळ नाही .मुलांसाठी सुरक्षित आणि आनंददायी जागा निर्माण करणं, शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी करण हाच या सगळ्याचा मूळ उद्देश होता, आहे. पण याचबरोबर अनेकांसोबत या प्रवासात एक अनोख अस नात तयार झालंय. गेल्या दहा वर्षात या सगळ्यांनी आमच अख्ख आयुष्य व्यापून टाकलंय आणि त्याला अर्थ देखील दिलाय. एक व्यक्ती म्हणून आम्हाला या अनुभवाने अधिक समृद्ध केलंय. हा सगळा प्रवास फक्त स्वतःपुरता न ठेवता तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचवावा म्हणून हा सगळा खटाटोप….
इथून पुढे १ महिना मी दर ३/४ दिवसांनी आनंदघराच्या गोष्टी घेऊन तुमच्याकडे येणार आहे.. आशा आहे तुम्हाला त्या आवडतील...
अव्दैत...
Comments
Post a Comment