हे फोटोज का महत्त्वाचे आहेत????
जर तुम्ही ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान रामपुरा, चोपडा येथे गेलात तर तुम्हाला ७०% घरांना कुलूप दिसेल. कुठे जातात हि लोकं ? तर हि जातात ऊस तोडणी साठी किंवा रस्ते बनवण्याच्या कामासाठी.
ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण १५ लाख लोकं आपल्या मुलांसोबत ऊस-तोडणीसाठी स्थलांतर करतात. याकाळात हि मुलं शालेय शिक्षण प्रक्रियेपासून दूर तर जातातच पण त्याचसोबत त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील बहुतांश मूल आपल्या पालकांना कामात मदत करताना कळत-नकळत बाल-मजुरीत लोटली जातात. ती कधी ऊस कापण्यासाठी हातात विळा घेतात तर कधी डांबर वाहण्यासाठी डोक्यावर टोपली. तात्पुरत्या उभ्या केलेल्या पालाच्या झोडप्यात अनेक समस्यांना तोंड देतात. कधीतरी कुटुंबातले मोठे कामावर गेलेले असताना त्या वस्त्यात एकटे राहताना शाररिक, लैंगिक छळाला सामोरे जातात.
रामपुरात वर्धिष्णू सामाजिक संस्थेच्या अंतर्गत सुरु असलेल्या आमच्या आनंदघरातील शुभम आणि कालूसिंग या आमच्या फेलोजना ज्यावेळी हे कळलं कि आनंदघरातली १६ मुलं त्यांच्या पालकांसोबत स्थलांतरित होणार आहेत. त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. मात्र स्वतःतल्या अस्वस्थतेला अशीच दाबून न टाकता त्यावर काय करता येईल यावर त्यांचा विचार सुरु झाला आणि पालकांसोबत चर्चा सुरु झाली. कधी गृहभेटी तर कधी मोहल्ला सभा या माध्यमातून ते पालकांसोबत बोलायला लागले.
आपण गेलो तर मुलांच्या शिक्षणच नुकसान होईल हे माहिती असताना देखील, "मुकादमाकडून आगाऊ पैसे घेतले आहेत त्यामुळे जावं तर लागेलच." "पिढ्यानपिढ्या हेच सुरु आहे दादा, आता कसं थांबवायचं?" हेच उत्तर मिळत राहिलं. आठवड्याभरा नंतर मात्र त्यांना एक आशेचा किरण सीताआजी यांच्यारूपात दिसला. आनंद घरातल्या रितिक आणि वीरचीआजी.
त्यादिवशी रात्रीच्या जेवणात पोराचं लइ नुकसान होईल म्ह्णून यावर्षी आपण ऊसतोडणीला जायचं नाही, त्याचे जे काही परिणाम होतील ते आपण बघून घेऊ, असं त्यांनी जाहीर घरात करून टाकलं. त्यांच्या मुलाला-सुनेला त्यांनी हे पटवून दिलं आणि त्यांना देखील हा निर्णय पटला. पण केवळ हा निर्णय घेऊन चालणार नव्हतं. मुकादमाचे पैसे कसे परत करायचे हा यक्ष प्रश्न अनुत्तरित होता. पुढचा एक महिना या कुटुंबाने मिळेल ते काम केलं आणि १०००० रुपये जमा केले आणि मुकादमा नेऊन दिले आणि ठणकावून सांगितलं कि आम्ही येणार नाही. सीताआजी नी घेतलेली भूमिका रामपुऱ्यात एक वेगळा संदेश घेऊन गेली. यावर्षी ६ कुटुंबांनी मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून स्थलांतर करायचं नाही हा निर्णय घेतला आणि आनंद घरातली ८ मुलं स्थलांतरित होण्याची थांबली.
८ मुलं स्थलांतरित न होणं म्हणजे ८ मुलांचं बाल-मजूर होण्यापासून वाचणं. ८ मुलं स्थलांतरित न होणं म्हणजे ८ मुलांचं शाररिक-लैंगिक अत्याचारापासून वाचणं. ८ मुलं स्थलांतरित न होणं म्हणजे ८ मुलं शाळा-बाह्य होण्यापासून वाचणं . ८ मुलं स्थलांतरित न होणं म्हणजेच ८ मुलांसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी उज्वल भवितव्याचा एक आशेचा किरण.
हा निर्णय अत्यंत धाडसाचं आहे. हा निर्णय पिढ्यानपिढ्या सुरु असलेल्या स्थलांतराच्या, व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचा आहे. या निर्णयामुळे या सहाही कुटुंबाला काय कष्ट, श्रम घ्यावे लागले असतील याची आपण कल्पनाच केवळ करू शकतो. मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा काढत ठाम उभा राहणाऱ्या या सहा कुटुंबांच्या धाडसाचं, कौतुक करायलाच हवं असं आम्हाला वाटलं आणि यावर्षी वर्धिष्णूच्या वर्धापन दिनाच्या उपक्रमात आम्ही या सहाही कुटुंबाचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला.
वरचे फोटो हे २२ जून २०२४ रोजी जळगाव येथे पार पडलेल्या वर्धिष्णू सामाजिक संस्थेच्या ११व्य वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा आहे. साधारण ४०० लोकांच्या समोर स्टेजवर येत सत्कार स्वीकारताना जस पालकांच्या डोळ्यात पाणी होतं तसच ते आमच्या डोळ्यात देखील होत आणि तेच पाणी न थांबणाऱ्या टाळ्या वाजवणाऱ्या त्या सभागृहातील प्रेक्षकांच्या डोळ्यात देखील होत.
हे नुसते फोटो नाहीत तर आशेचा एक किरण आहेत. हे फोटोज म्हणजे "वंचित घटकातल्या लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काही पडलेल नसतं ओ" असा गैरसमज असणाऱ्या प्रत्येकाला दिलेलं उत्तर आहे. हे फोटोज प्रतीक आहेत लोकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे आणि धाडसाचे. हे फोटोज मुलांना सुरक्षित आणि आनंददायी बालपण देण्याच्या स्वप्नांचा मागोवा घेणाऱ्या आमच्या प्रयत्नांना बळ देणारे.
-------स्थलांतरित न होण्याचा निर्णयाने केवळ वस्तीतील इतर लोकांनाच बळ दिलं असं नाही तर चोपड्यातील अनेक संवेदनशील लोकांना देखील स्तब्द केलं. यावर्षी आम्ही केवळ स्थलांतर थांबवण्यासाठीच नाही तर स्थलांतरित न होणाऱ्या लोकांना चोपड्यातचं पर्यायी रोजगार बोलवून देता येतो का यासाठी शहरातील व्यावसायिक, उद्योजक आणि इतर लोकांसोबत काम करत आहोत. स्थलांतरित मुलं शिक्षणाच्या प्रवासात कायम राहावी यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, मात्र स्थलांतरच थांबवता येईल का यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
Comments
Post a Comment