आनंदघराचं ग्रंथालय
आनंदघराचं ग्रंथालय
वाचन गंमत असते. वाचता येणाऱ्यांसाठी आणि नव्याने वाचायला शिकणाऱ्यांसाठीसुद्धा. वाचन शिकण्यासाठी प्रेरणा महत्वाची असते. पुस्तकं वाचनासाठीची प्रेरणा जिवंत ठेवतात. वस्तीबाहेरचे बरेच अनुभव जे मुलांपर्यंत येऊच शकत नाहीत, अशा अनुभवांपर्यंत मुलांना पोहोचवण्याचे काम पुस्तकं करतात. पुस्तकांसोबत शिकणं आणि शिकवणं दोन्ही मजेदार होतं.
अलीकडेच आमच्या आनंदघरात ग्रंथालय आलंय. मुलांना आवडतील अशी खूप वेगवेगळी पुस्तके वर्गात नेली. मुलांसमोर पसरून ठेवली. प्रचंड उत्सुकतेने मुलांनी प्रत्येक एक पुस्तक बघितलं. ही पुस्तके आपण घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो हे कळल्यावर मुलांना खूप आनंद झाला. आम्ही सर्वांनी मिळून ग्रंथालयाची नियमावली बनवली. पुस्तकांची काळजी कशी घ्यायची याबद्दल चर्चा केली. देव- घेव कार्ड म्हणजे काय, ते का वापरायचं हे समजून घेतलं. लगेचच देव-घेव कार्ड बनवले. मुलं हळूहळू पुस्तकं घरी घेऊन जाऊ लागली. पुस्तकं नेताना आणि आणताना कार्डमध्ये न चुकता नोंद करू लागली. अप्रत्यक्षपणे ग्रंथालयाची प्रणाली मुलांच्या लक्षात आली.
बरं, मग आता पुस्तक वाचलं तर ताईला त्यातल्या गमतीजमती सांगायला नकोत? पुस्तकं परत आणताच त्यात काय काय होतं हे मुलं ताईला भरभरून सांगतात. पुस्तकातल्या आवडलेल्या भागाबरोबरच न आवडलेला भागसुद्धा आवर्जून सांगतात. वाचताना भावलेल्या एखाद्या प्रसंगाचे चित्र काढतात. वाचता न येणारी मुलेही पुस्तकातली चित्रे पाहतात, वाचतात आणि चित्रांवर चर्चाही करतात. त्यांच्यासाठी चित्रकथांची पुस्तकं! वाचलेले समजणारी मुलं सर्व प्रकारची पुस्तकं आवडीने वाचतात. पुस्तकांमुळे त्यांना एकमेकांशी बोलण्याचे नवीन विषय मिळतात. वाचलेले स्वतःहून समजून घेण्याची संधी मिळते.
मोठ्या गटातल्या वाचता येणाऱ्या मुलांनी तर अक्षरशः पुस्तकं खाऊन टाकली. जितू हा वर्गातला अतिशय शांत आणि खूप लोकांमध्ये न रमणाऱ्या मुलांपैकी एक. त्याने १६० पानांचं पुस्तक अगदी एकाच दिवसात वाचून परत केलं. जितूसारख्या स्वतःमध्ये रमणाऱ्या मुलांना पुस्तकांची खूप चांगली सोबत होते. जितूने पुस्तकांमध्ये मित्र शोधले. जितूच्या पुस्तकं वाचण्याचा प्रभाव वर्गातल्या इतर मुलांवर पडला आणि त्यांनीही पुस्तकं वाचायला सुरुवात केली. प्रतिक्षाने वाचण्यासाठी घेतलेली पुस्तकं शाळेत नेली. तिच्या शाळेतल्या इतर मैत्रिणींनी ती पुस्तकं वाचायला सुरुवात केली. पाठ्यपुस्तकंसुद्धा रटाळ करणाऱ्या शाळेत वाचनसंस्कृती फुलायला लागली.
मुलांनी घरी पुस्तकं नेण्याचा असा एक चांगला परिणाम झाला की मुलांच्या पालकांजवळ पुस्तकं पोहोचली. मुलं पालकांना पुस्तकं वाचून दाखवतात. वाचलेल्या गोष्टी त्यांना सांगतात. पालक पुस्तकं बघतात, त्यातली चित्रं बघतात. त्यामुळे पालकांची अक्षरांशी गट्टी जमायला लागली. पालकांनी लिहिते- वाचते होण्यासाठी ही खूप महत्वाची पायरी ठरली.
आता मुलं पुस्तकं ग्रंथालयात रचून ठेवणे, ठरलेल्या नियमांची एकमेकांना आठवण करून देणे. इथे - तिथे पडलेली पुस्तके व्यवस्थित कपाटात ठेवणे अशी सर्व कामे उत्साहाने करतात. पुस्तकांशी त्यांची मैत्री होऊ लागली आहे.
- अदिती
सेंटर लीड - फेलो एज्युकेटर, मेहरूण
Comments
Post a Comment