आनंदघराच्या प्रक्रियेत पालकांचा सहभाग

 जोपर्यंत पालक मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत सहभागी होत नाहीत तोपर्यंत अपेक्षित परिणाम साधता येत नाहीत. याचमुळे आनंदघराच्या प्रक्रियेत पालकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. 

सुरुवातीच्या काळात मरिमाता मंदिराच्या परिसरात उघड्यावर सुरु असलेल्या आनंदघरात अनेक अडचणी होत्या. लाईटची योग्य सोय नव्हती. पाउस पडला कि सुट्टी द्यावी लागायची; पण या उघड्या जागेत केंद्र सुरु करण्याचा एक मुख्य फायदा म्हणजे आनंदघरात काय सुरुये हे पालकांना सतत दिसत असायचं. शाळेच्या बंद भिंतीआड घडणाऱ्या घटनांपेक्षा हे वेगळ होत. गाडीवरून आम्ही उतरल्या उतरल्या आम्हाला येऊन बिलगणारी पोरं; अजिबात न ओरडता देखील आमचं ऐकणारी पोरं, अनेकांना हुसकावून लागलेली हि पोरं आम्हाला इतका जिव लावतायेत हे सगळच त्यांच्यासाठी नवीन होत, वेगळ होत. पण पालकांचा विश्वास आमच्यावर बसण्यासाठी याचा खूप उपयोग झाला. नकळतच आमच्यात एक नात निर्माण होत होतं.

सुरुवातीला खरंतर पालकांनी आमच्याकडे फारस लक्ष दिलच नव्हत. “पोर आहेत काही दिवस येतील आणि मग कंटाळली कि होईल बंद” असाच एकंदरीत दृष्टीकोन होता. पण जसा-जसा वेळ पुढे जायला लागला तशी त्यांची भूमिका बदलायला जगली. 

मरिमातेच्या मंदिरात सुरुवातीला आम्ही जायचो त्यावेळी तिथे अनेक जण पत्ते खेळत बसलेले असायचे; कुणीतरी दारू पिऊन झोपलेलं असायचं. आम्ही कधीच कोणाला तिथून जायला सांगितल नाही. मुळात ती त्यांचीच जागा होती; आम्हीच तिथे परके होतो. मात्र लवकरच आम्ही गेलो कि लोकं लगेचच पत्यांचा डाव आटोपता घेत आम्हाला जागा करून द्यायचे. नंतर नंतर आम्ही  यायच्या आधीच डाव संपायला लागला. मंदिरात पोहोचल कि आमच पहिलं काम म्हणजे तिथे झाडू मारायचा आणि जागा स्वच्छ करायची. काही महिने गेल्यावर तर तिथलेच एक दादा आम्ही यायच्या आधी जागा झाडून, पाणी मारून स्वच्छ करून ठेवायला लागले. आनंदघराच्या कामात त्यांनी त्यांचा वाटा स्वतःहूनच उचलला होता. 

आता पालक देखील आनंदघरात येऊन पायऱ्यांवर बसून कौतुकाने मुलांना बघायला लागले होते. कधीतरी त्यांच्यातली आई, वडील अचानक उफाळून यायचे आणि मग मुलांना “सांग ना रे, सर काय विचारी रहीना” असा दम द्यायचे; यामुळे ते पोरं बाबरून जायचं. मग आम्ही त्यांना सांगितल; “तो अगदी व्यवस्थित सगळ करेल त्याला घाबरवू नका, तुम्ही शांतपणे थोड दूर बसून बघा.” आणि मग पटपट उत्तर देणारं पोर बघून त्यांच्या डोळ्यात आनंद दाटून यायचा. 

तंट्या-भिल वस्तीत ज्यावेळी आम्ही नवीन आनंदघर सुरु केलं; त्यावेळी तिथं दररोज एक छोट्या पोरीला घेऊन तिची आई यायची, आनंदघर संपेपर्यंत बसून राहायची आणि मग तिला परत घेऊन जायची. त्या दोघी माय-लेकी तंट्या-भिल मध्ये रहात नव्हता; मात्र त्या आईला कोणीतरी सांगितल कि इथे असं एक केंद्र सुरु झालंय, तिथे पैसे लागत नाहीत; आपल्या पोरीने पण शिकावं म्हणून ती माय दररोज दुरून तिला तिथे घेऊन येत होती. “कोण म्हणत, वस्तीतले पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक नसतात? ” 

प्रेम, जिव्हाळा, आपुलकी यामुळे मुलांना आनंदघराची गोडी लागायला लागली होती; लिहिण्या-वाचण्यासाठी आम्ही करत असलेले प्रयोग यशस्वी व्हायला लागले होते त्यामुळे आता पुढचा टप्पा म्हणजे मुलांना शाळेत दाखल करणं हा होता. अजुपर्यंत मुलं शाळेत जायला लागली न्हवती, त्याचं काम सुरूच होतं. त्यामुळे साधारण दुपारी ३ पर्यंत घरी यायचं. अंघोळ, थोडा नाश्ता झाला कि ५ वाजेपर्यंत आनंदघरात यायचं असाच त्यांचा दिनक्रम होता. यामुळे पालकांना तक्रार करायला फारशी जागा नव्हती.

एक मुलं वयाच्या साधारण सहाव्या वर्षी  इतर मित्र-मैत्रिणींसोबत छोटी-मोठी काम करायला सुरुवात करत आणि दिवसाला दहा/वीस रुपये कमवून आणत. आई-वडील आणि किमान ४ पोरं अश्या कुटुंबात हे रोजचे मिळणारे दहा-वीस रुपये खूप महत्वाचे आहेत, शाळेत गेले तर हा रोज बुडेल आणि त्यामुळे पालक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवायला फारसे उत्सुक नसतील असा आमचा समज होता. मात्र कोणत्याही पालकांना आपल्या मुलांना उत्तम भविष्य मिळावे असे मनोमन वाटत असते, हा विचार मात्र सुरुवातीला आमच्या मनाला शिवला देखील नाही. मुळातच कुटुंबाचे पालन-पोषण करण्याची जवाबदारी ही मुलांची नाही तर पालकांची आहे.

बहुतांश वेळेस मुलांच्या आनंदघरातील किंवा एकंदरीच वागण्याच्या मागे घरातील वातावरण कारणीभूत असत. यालाच घेऊन मग आम्ही गृह-भेटी सुरु केल्या. गृह भेटी पासून पालकांसोबत जडलेल्या आमच्या नात्याचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे त्यांना एकत्रित पालक-सभेसाठी बोलावणं. पहिल्या गृह भेटीचे अर्ज भरतानाच आम्ही पालकांच्या कामाच्या वेळा आणि दिवस याची नोंद करून ठेवतो याचा फायदा आम्हाला पालकसभांचे नियोजन करण्यासाठी झाला.  

प्रत्तेक पालक-सभेचा एक ठराविक असा विषय ठरवला जातो. यात मग मुलांचे आरोग्य, शाळेतील अडचणी, वर्तवणूक आणि या सगळ्या सोबतच महत्वाचे म्हणजे मुलांचे कौतुक असे विविध विषय असतात. पालकांना आनंदघरात मुलांना शिकवण्यासाठी जे खेळ वापरले जातात तेच आम्ही पालकांसोबत पालकसभेत खेळतो. 

आनंदघरातील विविध निर्णयांमध्ये पालकांचा सहभाग असावा यासाठी पालकसभेमध्ये आनंदघराच्या बाबतीतले महत्वाचे बदल, नवीन योजन याबाबत बोलले जाते. 

आज पालक त्यांच्या मुलांच्या आयुष्याचे महत्वाचे निर्णय घेण्याआधी आम्हाला आमचे मत विचारतात. दादा-ताईने सांगितलं आहे कि मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्यावरच तिच्या लग्नाचा विचार करायचा म्हणून लग्न लहान वयात करणार नाही, असं पालक जेव्हा विश्वासाने सांगतात / वागतात त्यावेळी आम्हाला समाधान मिळते. 

२०१७साली आम्ही जळगावातील समता नगर परिसरात दुसरे आनंदघर सुरु केले. सुरुवातीपासूनच इथल्या बौद्ध विहाराच्या एका छोट्या खोलीत हे आनंदघर चालायचे. या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त इथल्या रहिवाश्यांनी वर्गणी गोळा केली. उत्सवातून उरलेल्या पैस्यात त्यांनी याच भागातील एका मोकळ्या जागेत आनंदघरासाठी एक मोठी खोली बांधायचा निर्णय वस्तीतल्या लोकांनी घेतला. यासाठी आम्ही देखील एक छोटी मदत केली. गेल्या चार वर्षाहून अधिक काळ या जागेत आनंदघर सुरु आहे. 

आम्हाला खायला नकोय, शिक्षण हवंय असं म्हणणाऱ्या लोकांनी वस्तीतील अगदी मोक्याची जागा आनंदघरासाठी देऊ केली. आज जैन उद्योग समूहाच्या मदतीने तिथे बांधलेल्या १५ बाय १५च्या खोलीत तिथली जवळपास ४०मुल अत्यंत आनंददाने आणि प्रेमाने शिकत आहेत. 

पालकांना केंद्राच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यावर काय जादू होते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मुळातच आनंदघराचा एक हेतू हा शिक्षणाविषयी सजग परिवार निर्माण करण्याचा आहे आणि ज्यावेळी अश्या घटना घडतात त्यावेळी आपला प्रवास योग्य दिशेने सुरु आहे याची ग्वाही मिळते.




Comments

Popular posts from this blog

आनंदघराचं ग्रंथालय

आनंदघरातली मासिक पाळी अभ्यासक्रमाची सुरुवात..

मेहरूण आनंदघराची १० वर्ष...