गुड्डी आणि पूजा


आनंदघर सुरु करून काही दिवसच झाले होते. त्यावेळी पहिल्यांदा गुड्डी आणि पूजा या दोघा बहिणींशी ओळख झाली. पूजा १४/१५ वर्षाची तर धाकटी गुड्डी साधारण ८ वर्षाची. वडील नाहीत. घरी या दोघी आणि यांची आई.
पूजा आणि तिची आई दिवसभर कचरा वेचायला जायच्या आणि गुड्डी घरी बसून घरकाम करायची. दिवसा ती देखील कचरा वेचायला जायची पण दुपारपर्यंत परत येणार. संध्याकाळी आई आणि पूजा परत येईपर्यंत भाजी, भाकरी तयार करण, भात लावण, घर झाडून पुसून काढण हि सगळी काम गुड्डीची. वयाच्या मानाने उंची थोडी कमीच, थोडीशी लट्ठ, गुटख्याने कायम तोंड भरलेल आणि त्यासोबत शिव्यांची लाखोली. गुड्डीच कुठलंच वाक्य शिवी दिल्याखेरीस पूर्ण होतच नाही. अत्यंत भांडखोर म्हणून सगळ्यांमध्ये प्रसिद्ध. पण हळू-हळू लक्षात यायला लागल कि हि मुलगी हुशार आहे. धीट आहे. गुड्डीच इतरांशी कधीच पटल नाही. एखाद्याने त्रास दिला तर हि कानाखाली वाजवून द्यायला पण कमी करायची नाही. थोड जरी मनाविरुद्ध झाल कि हिने समोरच्याला तुडवलाच म्हणून समजा. सुरुवातीला आम्हाला देखील हिच्याशी वागाव कस हे कळायचं नाही.
गुड्डीच वागण, बोलण, शिव्या देण, मारण हे काही इतरांपेक्षा वेगळ नव्हत. बहुतांश कचरा वेचक मुला/मुलींमध्ये हे दिसून येत. वरवर पाहता, “मुलांना शिस्त नाही.” “पालकांनाच कस वागाव हे कळत नाही तर मुलांना कुठून कळणार?" “हि मुल अशीच असतात.” अस म्हणन खूप सोप आहे. पण मुलांच्या मनाचा विचार केला कि ह्या सगळ्याच मूळ समजून घेता येण शक्य आहे. 
गुड्डीच्या बाबतीत म्हणायचं झाल. तर खेळण्याच्या, मजा करण्याच्या वयात आपल्याला  घरकामात अडकून पडाव लागतंय ह्याचा प्रचंड राग तिच्या मनात होता. इतरांना खेळायला मिळत, पण मला नाही ह्याची चीड तिला होती आणि घरच्यांचा सगळा राग ती इतरांवर काढत होती. पण पोरगी प्रचंड लाघवी. जीव लावणारी.
हिच्या भांडकुदळ स्वभावामुळे कुणी सुरुवातील तिच्यासोबत बसायला तयार नसायचं. पण हळू हळू चित्र बदलायला लागल. गुड्डीला नकला करायला प्रचंड आवडायचं. कुमार निर्माणच्या एका शिबिराला तर हिने भूताचा इतका मस्त अभिनय केला कि सगळेच तिचे फॅन झाले. पुढचे कित्तेक दिवस सगळेच गुड्डीच कौतुक करत होते. या कौतुकाने ती अगदी हुरळून गेली होती. अभ्यासात लक्ष द्यायला लागली होती. गुटखा सोडण्याचा प्रयत्न करत होती. किमान सेंटरवर असताना तरी आता तिच्या तोंडात गुटखा नसायचा.
दुसरीकडे पूजाला नट्टा-पट्टा करायला आवडायचं. भडक कपडे, स्वच्छ विंचरलेले केस आणि सतत गुटखा खाऊन लाल-लाल झालेलं तोंड असा एकून पूजाचा अवतार असायचा. पूजा अगदी गुद्दीच्या उलट. कोणाशी फारस बोलणार नाही. आली तरी शांत बसणार, पुस्तक हातात घेऊन वाचायचा प्रयत्न करणार. काही महिन्यांच्या प्रयत्नांनंतर पूजा अगदी व्यवस्थित वाचायला लागली होती.
पूजा वयात येत होती. तिच्यात होणारे शारारिक आणि मानसिक बदलांमुळे थोडीशी घाबरलेली होती. विरुद्ध लिंगाबद्दलच आकर्षण वाढत होत. हा बदल आमच्याही लक्षात येत होता. मुलाचं लक्ष आपल्याकडे जाव, ह्यासाठी तिचा चाललेला आटापिटा आमच्या नजरेत येत होता. प्रणाली तिच्याशी या विषयावर अधूनमधून बोलत होती. पण एक दिवस अचानक तिच्या हातात कुठूनतरी मोबाईल आला आणि पूजाच सेंटरवर येण अचानक बंद झाल. पूजाने कामाला जाण बंद केल होत. दिवसभर हातात मोबाईल घेऊन त्यात काहीतरी करत बसलेली असते अस सगळ्यांनी अम्हाल सांगितल.
तिच्याशी बोलायला म्हणून मी आणि प्रणाली तिच्या घरी गेलो. एरवी आपले शिक्षक दिसले हि उलट्या दिशेने पळत सुटणारी पोर आपण बघतो पण आमच्या इथे सगळ उलटच असत. आम्हाला बघितल कि मुल असतील तिथून, असतील तशी पळत सुटतात आणि आम्हाला येऊन बिलगतात. आजपर्यंत आम्हाला बघून पळून जाणारी आणि घरात लपणारी पूजा हि एकमेव मुलगी. त्या दिवशी आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला दुरूनच बघून ती घरात पळून गेली. तिच्या आईने मात्र आम्हाला ती बाहेर गेलीये अस सांगतील.
सुरुवातीला घरकामात किमान थोडीतरी मदत करणाऱ्या पूजाने आता सगळच अंग काढून घेतल्याने गुड्डीची चिडचिड वाढत होती. यामुळे ति सतत गैरहजर राहायला लागली होती. पूजाबद्दल मुलांकडून वेगवेगळ्या गोष्टी कानावर पडू लागल्या. काही दिवसानंतर गुड्डीच देखील सेंटरवर येण बंद झाल. विविध प्रकारे त्यांच्याशी संपर्क करण्याचे सगळे प्रयत्न सपशेल फेल गेले आणि अश्यातच एक दिवस पूजा आणि गुड्डीने आईसहीत एका रात्रीतून जळगाव सोडल. कुठे गेले? का गेले? काही कळल नाही....
शाळेत जायला प्रचंड उत्सुक असलेली गुड्डी, शाळेत गेली का? कुठे राहते? काय करते या कुठल्याच प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत.
काही दिवसापूर्वी अचानक गुड्डी सेंटरवर दाखल झाली. पूर्वीपेक्षा लक्षात येईल इतक वजन कमी झालंय. अंगात सणाचे चांगले कपडे होते. इथून अचानक का गेले? याच उत्तर तिने दिल नाही मात्रकुठे असते? याची चौकशी केल्यावर सध्या ते सगळे नाशिकला असतात अस कळल. नाशिकच्या एका वस्तीत त्यांनीदेखील एक झोपडी बांधलीये आणि आता तिथच ती आणि तिची आई दोघी राहतात. शाळेत नाव टाकलंय अस म्हणाली, पण फारस ठामपणे नाही. गुड्डी आता नाशिकमध्ये कचरा वेचते.

Comments

Popular posts from this blog

आनंदघराचं ग्रंथालय

आनंदघरातली मासिक पाळी अभ्यासक्रमाची सुरुवात..

आनंदघर डायरीज...