आनंदघरातली मासिक पाळी अभ्यासक्रमाची सुरुवात..


या शैक्षणिक वर्षापासून आनंदघरात आम्ही मुलींसोबत तसेच महिला पालकांसोबत मासिक पाळी या विषयाला घेऊन एक संपूर्ण अभ्यासक्रम राबवायला सुरुवात करत आहोत. नुकतेच या संदर्भातले पहिले सत्र समता नगर आनंदघरात झाले. या सत्राविषयी आणि अनुभवाविषयी आनंदघरातली फेलो एज्युकेटर निशा मसराम हिने लिहिलेला हा लेख.


नमिताने ‘मासिक पाळीचे’ सेशन आम्हां Educators सोबत घेतल्या नंतर उस्तुकता लागली होती की कधी आम्ही एकदा मुलीसोबत हे सेशन घ्यायला सुरुवात करू. आता जुलै महिन्यात पहिल सेशन घ्यायचं आहे हे ठरल्यानंतर आमची सेशनची तयारी चालू झाली.

मुलीशीं बोलणे. किती मुलींची पाळी येते? किती मुलींची पाळी पुढच्या सहा महिन्यात चालू होणार? दोन्ही मुली मिळून एकूण किती मुलींपर्यंत ही माहिती पोहचणार आहे? किती मुलींना लिहिता वाचता येत अशी बरीच माहिती एकत्र करून, ‘पहिलं सेशन interactive कस असणार ? मुली सेशन बद्दल कसे react करणार ? आम्ही त्यांचा उत्साह व रस टिकवू शकणार काय ? अशी बरीच प्रश्न डोकात येऊन गेली.

सेशनच्या तीन दिवसंआधी मुलीशी याविषयावर बोलायचं ठरवलं. मुलींना जेव्हा कळलं की ताई ‘मासिक पाळी विषयावर’ आपल्याशी बोलणार आहे’ तेव्हा मुलींना खूप लाज वाटली आणि त्या मला म्हणाल्या “काय वं ताई, तुम्हाला लाज नाही येत काय असं काहीबी बोलता तर?”

तेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली की “अग हे सेशन घेणे का गरजेचे आहे. या सेशन मुळे आपल्याला काय काय चांगले फायदे होणार आणि बरंच काही”.

तेव्हा मुलीनी ओरडून मला सांगितलं “ताई आम्ही सेशन ला येऊ पण या ‘पोटयांना’ आडी बोलावजो नका, नाहीतर आम्ही आडी येणार नाही”!

आम्ही म्हंटल ठीक आहे. आता प्रश्न होता मुलांना कसं सांगायचं; तर आम्ही मुलींवरच सोडलं तुम्ही सांगा मुलांना. मुलीनीचं मुलांना सांगितलं  की “ताई आमचा special सेशन घेणार आहे, तुम्ही इकडे भटकायचं पण नाही, नाहीतर मार खाणार”!

मूलं समजून गेलेत आणि ‘ताई म्हणून आम्हाला सर्व गोष्टी सोप्या झाल्यात’.

आता आला सेशनचा दिवस

मुली 3 वाजता आनंदघरात येऊन तयार होत्या. सोबत त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणी, ताई, घराकडच्या ताई आणि आनंदघरात जी मूल येतात त्यांच्या मोठ्या बहिणी असे ऐकून 15 ते 16 मुली आनंदघरात आल्या.

“खरं तर इतक्या मुलींना बघून ‘आज मी मासिक पाळीसारख्या मोठ्या विषयावर मुलींशी बोलणार आहे, सत्र facilitate करणार आहे’ हे कळल्यावर खूप घाबरायला झालं. चुकून काही जास्त बोललं गेलं तर मुलीतर जाम हसतील मला!”

सर्व मुली गोलात बसल्यावर सेशन ला सुरुवार झाली. मुली खूप उत्सुक दिसत होत्या, त्यांची एकमेकिंसोबत कानफुसी चालली आहे हे बघता ball passingच्या खेळाने सेशन ची सुरुवात करू असं सुचलं.

“आत्ता तुमच्या मनात काय चालल आहे ते सांगा?” या प्रश्नाने सुरुवात झाली.

मुली बोलायला लागल्या, हळू हळू मोकळ्या झाला. “ताई, मी नां आज तुम्ही काय घेणार आहे याचा विचार करत आहे.” ‘तुम्ही आज खेळवणार आहात असं वाटत आहे.” तर सलोनी म्हणाली, “आव ताई, आताच शाळेतून आली मला एक पोरीन शाळेतून घरी येतांना सांगितलं की सर्व पोरी आनंदघरात जमा झाल्यात तशीच मी पळत पळत घरी गेली bag फेकली आणि आनंदघरात आली, बघा माझा अवतार, मला काहीच मिस मारायचं नव्हत”.

मुलीशी बोलून खूप भारी वाटलं आणि मुलींसोबतच्या या खेळाने माझी स्वतःची भीती कमी केली.

फळ्यावर मी ‘मासिक पाळी’ हे मोठ्या अक्षरात लिहलं. मुली वाचत होत्या आणि हसत, लाजत होत्या.

‘मासिक पाळी’! “तर मग, मला सांगा इथे बसणाऱ्या आपल्यापैकी किती मुलीना ‘पाळी’ येते?” हे ऐकताच एकाही मुलींने हात वर केला नाही. सर्व मुली शांत झाल्या. काय झालं मला कळलंच नाही. तेव्हा “मी मोठ्याने म्हणाले मला येते पाळी” असं म्हणून मी हात वर केला. तेवढ्यात माझ्यासोबतच्या आनंदघरातल्या इतर ताया विजया, अश्विनी, मंगला आणि सुनीताने सुद्धा उंच हात वर केला. पाचही तायांनी आपल्यासमोर ‘हात’ वर केलेला बघून हळू हळू आनंदघरातील ११ मुलीनी हात वर केला आणि म्हणाल्या “ताई मला पण येते पाळी’!

मुलीनी तयार केलेला mind-map

मुलींचा आम्हां ‘ताई’ वरचा हा विश्वास बघून मला खूप Energetic feel झालं. ‘आपल्या पोरी त्यांचे प्रश्न, मनातील भावना आपल्याला विश्वासाने सांगू शकतात!’ याचा मला खूप आनंद झाला.

माझ सेशन पुढे चालू होत....

“मासिक पाळी ऐकल्यावर मनात काय विचार येतात?” असा प्रश्न विचारला आणि आनंदघरातील ४ मुली ज्या थोड्या धाडसी आहेत त्यांनी प्रथम उत्तर दिल “ताई रक्त”

दुसरी म्हणाली “हातपाय दुखतात वं ताई.” “देवाला हात लाऊ नको, त्रास, चिडचिड, tension, उंची वाढत नाही कापड, sanitary pads, आज कोणते कपडे घालायचे?”

“पिपल्स/ मुरूम येतात, पूजा करू शकत नाही? जीव तळमळतो, कमजोरी” अशी अनेक उत्तर आता यायला लागली होती.

तेवढ्यात ताई बोलली ‘मातृत्व’

मुली म्हणाल्या, “ताई‘मातृत्व’ म्हणजे काय?”

मातृत्व म्हणजे “ज्या मुलींना मासिक पाळी येते ती मोठी झाल्यावर आई होऊ शकते, तिला देवाने आई होण्याच वरदान दिलं आहे!”

आणि असा आमचा संपूर्ण फळा रंगाला mind map ने!

आता मुली प्रश्न विचारू लागल्या.

“काय वं ताई मला सांगा ‘पाळी आली की देवाला का हात लावू नये असं घरातले सांगतात?”

“मग तुम्ही देव पूजा करता काय?”

“मला सांगा ‘पाळी आली की उंची वाढत नाही असे म्हणतात हे खरं आहे काय हे?”

वैष्णावी ने विचारलं, “ताई माझ्या मैत्रिणी ला 9 वर्षाची असताना पाळी आली तर लवकर पाळी आली तर वाईट असत काय? (हा प्रश्न तिचाच होता पण तिने विचारतांना मैत्रिणीच नाव घेतलं)”

तेवढ्यात मंगलाताई ने उत्तर दिल “मला सांगा निशाताई ला पाळी येते तिची उंची कमी आहे की जास्त, मुली ने सांगितलं, “खोट सांगतात वं ताई लोक? निशाताई तर उंच आहे!”

“ताई असं सांगतात की,  पाळी चालू असतांना मुलांच्या / माणसांच्या जवळ जायचं नाही मग ‘शंकर भगवानची बायको पार्वती, तिला पाळी येत असेल तर ती त्यांच्या जवळ जात नेसल काय? ती तर नेहमीच शंकर भगवानांच्या जवळ बसलेली दिसते?”

असे अनेक प्रश्न मुलीनी विचारलेत.

याच प्रश्नांना पुढे चालू ठेवत असतांना; मी मुलींना विचारलं ‘तुम्हांला तुमच्या मासिक पाळीचा पहिला अनुभव सांगता येईल काय? हे ऐकताच सलोनी म्हणाली “ताई, वैष्णवी ताई मोठी आहे, तिच्या पासून आपण सुरुवात करू?” पण वैष्णवी चिडली आणि म्हणाली, “मी असं काही बोलणार नाही”.

मुली एकमेकींवर विषय ढकलतानां बघून मी विजयाताईला तिचा अनुभव सांगायला विचारलं, त्यानंतर अश्विनी स्वतः हून बोलली, मग मंगलाताई आणि सुनीताने त्यांचे अनुभव सांगितले. शेवटी मुलीनी मला फोर्स केला तुम्ही पण सांगा....

‘मी बोलले मला आठवीत असतांना ‘मासिक पाळी’ सुरु झाली. घरात मोठ्या बहिणी असल्याने मला कसलीच काळजी करावी लागली नाही. सर्व माझ्या बहिणी मला सांगायच्या आणि मी त्या प्रमाणे वागायचे. हळू हळू माझ्यात बदल होत गेलेत. मला आधी ‘पाळी’ या शब्दाचा प्रचंड राग यायचा पण जेव्हा मला यामागचे कारण कळले तेव्हा पासून  मी ‘मासिक पाळीला’ एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघायला सुरुवात केली’”

मुली आमचे अनुभव ऐकताना हरवून गेल्या होत्या.

मुलींना जेव्हा आम्ही सांगितलं की ‘पालक सभेत’ तुमचा आयांनी सुद्धा त्यांचा पाळीचे पहिले अनुभव सांगितले तेव्हा त्यांना इतक हसू आलं की त्या ‘तायांना’ विचारायला लागल्या “ताई काय सांगितल माझ्या आईने?”

हे सत्र सुरु करताना मुलींची एक pre test घेतली. ही pre test का घेतोय हे मुलींना सांगितल.

pre test घेतांना एक गोष्ट लक्षात आली की ‘ज्या मुलींना पाळी येते त्या लिहत होत्या. पण ज्यांना पाळी येत नाही त्या मुली माझ्या कडे आल्या आणि म्हणाला ‘आम्ही पण फॉर्म भरणार, आम्हाला येत नाही म्हणून काय? मला माहित आहे तीन दिवस काय होते ते माझ्या आई आणि बहिणीला बघते मी!

test भरतांना मासिक पाळीबद्दल बरीच प्रश्न होते पण त्यातला एक प्रश्न कोमल आणि दिव्याला कळला नाही. त्यांनी तो प्रश्न मला विचारला. तो प्रश्न होता ‘आपण काय खातो यापेक्षा पोट भरून खातो की नाही हे जास्त महत्वाचे आहे.’ दोघीं म्हणाल्या ‘बरोबर वं ताई, पोट भरलं पाहिजे. पण मी पाळी चालू असताना कमीच खाते कारण मग रक्त पण कमी जात आणि जास्त pad बदलावे लागत नाही’.

आज आम्ही सर्वजणी खूप खुश होतो कारण सेशन संपल्यानंतर सुद्धा मुली वर्गातून हलल्या नाहीत, त्यांना सांगाव लागलं की सेशन संपल आहे, तुम्ही आता घरी जाऊ शकता. पण मुलींना अजून आमच्याशी बोलायचं होत अजून वेगळ्या विषयावर जाणून घायचं होत.....

आनंदघरातली मासिकपाळी अभ्यासक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण झाली.

घरी आले आणि पहिला मेसेज मी नमिताला केला. सेशन कसं झाल त्याबद्दल तिला सांगितलं आणि तिला मनापासून ‘Thank you ताई’ म्हंटल. हे ऐकून नामिताचा message होता ‘तुझा मेसेज वाचून मला किती छान वाटलं..सुरुवात छान झालीये म्हणजे सगळंच छान होईल आता!


- निशा मसराम (फेलो एज्युकेटर, सेंटर लीड - समता नगर)






  

 

 

 


Comments

Popular posts from this blog

हे फोटोज का महत्त्वाचे आहेत????

मेहरूण आनंदघराची १० वर्ष...

आनंदघराचं ग्रंथालय