आनंदघरातील तारे - हर्षल
मरीमाता मंदिराच्या परिसरात रिकामटेकडी माणसंपूर्वी पत्ते खेळत बसलेली असायची, नाहीतरी पैसे लावूनइतर खेळ चाललेले असायचे. इथेच बाजूला समाज-मंदिराची एक छोटी बांधलेली होती. या खोलीत तिथल्याच एकाच बांधकामाच सामान पडलेलं होतं. आनंदघरासाठी ही खोली द्यायला हे तयार नव्हते. पावसाळ्यात आनंदघर बंद ठेवावे लागायचे पण पत्त्याचा डाव मात्र या खोल्यांमध्ये बिनदिक्कतपणे सुरु असायचा. लोकांना शिक्षणापेक्षा पत्ते जास्त महत्वाचे वाटायचे. याच अंगणात आनंदघर सुरू झालं आणि परिसराचं चित्र पालटू लागलं. सुरुवातीला आम्ही तिथे बसलो तरी आम्हाला न जुमानणारी ही माणसं आता आम्ही आलोय हे दिसताच स्वतःचं सामान आवरून बाहेर पडायला लागली. पत्त्यांची जागा आता चिमुरड्यांच्या लगबगीनं घेतली. मरीमातेचं अंगण लहान मुलांनी गजबजून जायला लागलं.
एक दिवस एक मुलगा आमच्याजवळ आला आणि म्हणाला, “सर, उद्यापासून मी पण येऊ का?” अर्थात, आम्ही त्याला लगेच हो म्हणून सांगितलं. तो परत जायला निघाला तेव्हा मी त्याला म्हटलं, “अरे,तुझं नाव तरी सांग.” “हर्षल”, तो म्हणाला. अशा रीतीनं हर्षल आमच्याशी जोडला गेला..
हर्षल तेव्हा आठवीत होता. अंगकाठी अगदी बारीक. घरी तो, त्याचे आई-वडील आणि भाऊ. तिथेच जवळ त्याच्या वडिलांची भाजी-पाल्याची गाडी होती. हर्षल इतर मुलांपेक्षा खूपच वेगळा. अत्यंत हुशार. बुद्धिमत्ता तीव्र. सतत नवीन काहीतरी करण्याच्या शोधात. त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखी त्याला कुठलीच व्यसनं नव्हती. अत्यंत शांत. कधी कुणाशी भांडण नाही, कुणाला शिव्या देणं नाही, कुणाची खोडी काढणं नाही.
जळगावात त्याकाळात लोडशेडिंग असायचं. इतर भागांमध्ये २ तास वीज नसेल, तर तांबापुरात सकाळी २/३ तास आणि संध्याकाळी २/३ तास अशी किमान ४/६ तास वीज नसायची. सकाळच्या वेळी काही अडचण यायची नाही; पण संध्याकाळी वीज नसली,की हर्षलला अभ्यास करायला त्रास व्हायचा. या पठ्ठ्यानं एक दिवस भंगार बाजारात जाऊन २० रुपयाचे LED लाईट, मोबाईलची बॅटरी आणली, इकडून-तिकडून काही तारा गोळ्या केल्या आणि चक्क दिवसाचार्ज केले की रात्री वीज गेल्यावर देखील व्यवस्थित उजेड देणारे दिवे तयार केले. आनंदघरात येताना आम्हाला दाखवायला घेऊन आला.
त्यानंतर काही दिवसांची गोष्ट. गाणी ऐकायला आपल्याकडे काही नाही,असं वाटल्यानं परत भंगार बाजारात जाऊन हर्षलनं थोड्या वस्तू विकत आणल्या आणि त्यापासून मोबाईलच्या बॅटरीवर चालेल असा चक्क FM रेडिओतयार केला. आणि तोही फक्त ३० रुपयांत. आम्हाला या पोराचं प्रचंड कौतुक वाटलं. एके दिवशी हर्षल आनंदघरात आला नाही. दुसऱ्या दिवशी कुठे गेला होतास म्हणून त्याला विचारल्यावर,“आमच्या समाजाचा कार्यक्रम होता. मग आपल्या समाजाच्या कार्यक्रमाला जायला नको का?” असा त्यानंच मला प्रतिप्रश्न केला. याचाच आधार घेऊन मी हर्षलशी बोलायला लागलो. बराच वेळ बोलल्यानंतर, अगदी शेवटी तो मला म्हणाला, “मग जर कुणी आपली जात विचारली तर काय उत्तर द्यायचं?” मी म्हणालो,“माणूस म्हणून सांग.” आणि तो विषय तिथेच संपला.तांबापुरा परिसरात हिंदू-मुस्लीम लोकसंख्या जवळपास समान आहे. इतर ठिकाणी घडतं, तसंच इथेही दर काही महिन्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वादाची ठिणगी टाकून जातीय दंगली घडवून आणल्या जातात. वरीलप्रमाणे हर्षलशी बोलणं झाल्यानंतर काही दिवसांनी अशीच एक दंगल झाली. पुढचे काही दिवस आम्हाला आनंदघर बंद ठेवावं लागलं.जे घडलं ते किती चुकीचं आहे, याबद्दल पुढे मुलांनी स्वतःहून चर्चा केली.
चर्चा सुरू असताना हर्षलनं अचानक मला प्रश्न केला, “सर तुमची जात कुठली?”
मी म्हणालो,“माणूस.”
“ठीक आहे.” हर्षलचं उत्तर आलं.
“का रे?असं का विचारलंस?”
तर त्यावर त्यानं उत्तर दिलं, “नाही, काही दिवसांपूर्वी तुम्ही मला सांगितलं होतंत,की कुणी जात विचारली तर माणूस म्हणून सांगावं आणि तसंच वागावं. म्हणून मी बघत होतो, आता तुम्ही काय उत्तर देता ते.”
तुमच्या प्रत्येककृतीकडे, बोलण्याकडे मुलांचं अगदी बारीक लक्ष असतं. अनेक बाबतीत ते तुमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक वाटला तर लगेच तुम्हाला तो दाखवून द्यायला मुलं कमी करत नाहीत किंवा त्यांचा तुमच्या बोलण्यावरून विश्वास उडायला लागतो; पण हेच जर तुम्ही बोलता तसेच वागता असं मुलांना जाणवतं,तेव्हा त्यांचा तुमच्याप्रती असलेला आदर, प्रेम वाढतं,याचं प्रात्यक्षिकच त्या दिवशी मला मिळालं.कुमार निर्माणच्या शिबिरात वर्षभरात केलेल्या कृतींची माहिती देण्याचं काम हर्षलचंच.या शिबिरांमध्ये मुलंच कामाची माहिती देतात आणि इतर गटातली मुलंत्यांना प्रश्न विचारतात. अशाच एका शिबिरात एकानं ‘सचिन – क्रिकेटचा देव’ या विषयावर माहिती दिली.
हर्षलनं त्या मुलाला विचारलं, “सचिनला क्रिकेटचा देव का म्हणतात?”
थोड्याशा गोंधळात पडलेल्या त्या मुलानं उत्तर दिलं, “कारण त्यानं खूप सेंच्युरी मारल्या आहेत म्हणून.”
“पण साईबाबांनी तर एकपण सेंच्युरी नाही मारली, मग त्यांना आपण देव का म्हणतो?” असा त्यावर हर्षलनं प्रतिप्रश्न केल्यावर समोरचा गारच पडला.
नववीची परीक्षा दिल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हर्षलनं एका इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम केलं. दहावी सुरू झाल्यावर हर्षल पुन्हा आनंदघरात यायला लागला. पण हर्षलच्या शैक्षणिक गरजा इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. इतरांसोबत तो आला तर त्याला वेळ देणं शक्य होत नव्हतं. तरी आम्ही इंग्लिश शिकत होतो. अशातच त्यानं इतर विषयांसाठी दुसऱ्या ठिकाणी शिकवणी लावली. दरम्यान त्यानं घरही बदललं. इतर शिकवण्यांच्या वेळा आनंदघराच्या वेळेतच आल्यानं, त्याचं आनंदघरात येणंबंद झालं. मात्र अधूनमधून हर्षल भेटत राहायचा. खरं तर त्याला टिकवून न ठेवता आल्याची एक सल मात्र मनात घर करून आहे.दहावीच्या परीक्षेत हर्षलला ७३% मार्क मिळाले. त्यानंतर त्याने आय.टी.आयमधून इलेक्ट्रिकल डिप्लोमा पूर्ण केला. गेल्या काही काळापासून हर्षल स्वतःच्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून घरगुती उपकरणे दुरुस्त करण्याची आणि इतर सेवा देत आहे.
काही काळापूर्वीच हर्षल आम्हाला भेटायला आला. आज वयाच्या २०व्या वर्षी हर्षलने जळगावात स्वतःचे ३ खोल्यांचे घर घेतले आहे आणि आई-वडिलांची पूर्ण काळजी घेतो आहे.
आपण समाजाचे देणं लागतो. हि भावना ठेवून काम करणारे खुपच कमी लोक/संस्था आहेत. वर्धिष्णु हि त्या मोजक्या संस्था पैकी एक आहे. आपलं काम सरहानीय आहे.
ReplyDelete