देणगी नाही संधी द्या...
आपल्याकडे एकंदरीत आर्थिक परिस्थिती बिकट असेलेली मुल असली कि अनेकांना आपण आपल्याला नको असलेल्या वस्तू वाटायची हौस येते. “आमच्याकडे काल पार्टी होती त्यातलं बरंच अन्न उरलंय, तुमच्या पोरांना देऊ का?” “माझे काही ड्रेस आहेत, अजिबात वापरलेले नाहीत, तुम्हाला चालतील का?” असे फोन सुरुवातीच्या काळात अनेक यायचे. आपल्यातील बहुतांश लोकांना आपल्या गरजा आणि हौस यात फरक करता येत नाही. लागत नाहीत अश्या वस्तू खरेदी करतो, गरजेपेक्षा जास्त अन्न आपण तयार करतो कारण कोणीतरी आहेच ज्याला देता येईल. त्यासोबतच “ह्या मुलांना शिकवायचं असेल ना तर काहीतरी लालूच दिलंच पाहिजे ओ, त्याशिवाय हि शिकणारच नाहीत.” असाच बहुदा समज सगळ्यांचा असतो.
या बाबतीत मॅान्टेसरीची गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे. मॅान्टेसरी स्कूल्स आपण अनेक पहिल्या असतील, पण मॅान्टेसरी हे नाव कसे आले ह्याचा इतिहास मात्र आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. मारिया मॅान्टेसरी हि इटलीमधील एक शिक्षीका होती. रूढार्थाने ती काही बी.एड, एम.एड नाही तर चक्क महिला डॉक्टर होती. तिने शिक्षण क्षेत्राला दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे पहिल्या शाळेच्या पायरीला मॅान्टेसरी स्कूल अस म्हणल जात. हि मॅान्टेसरी तिच्या शहरातील गरीब मुलांना शिकवायची. त्या भागातले अनेक लोक तिच्या या वर्गाला भेट द्यायला यायचे. असेल एक दिवस त्या भागातले पाद्री तिथे आले तर त्यांनी बघितल कि सगळी मुल एका चौकोनी डब्ब्या भोवती गोल करून उभी आहेत आणि एक छोटीशी चिमुरडी त्या डब्याशी खेळतेय.
ते जवळ गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आल कि त्या डब्ब्याला सगळ्या बाजूंनी चौकोनी, गोल, आयताकृती, त्रिकोणी अशी वेगवेगळ्या आकाराची छिद्र होती आणि ती मुलगी त्या सगळ्या छिदात त्याच आकाराच्या वस्तू टाकण्याचा प्रयत्न करत होती. त्या चिमुरडीच लक्ष विचलित व्हाव म्हणून मॅान्टेसरीने मुद्दाम सगळ्या मुलांना जोरात गांण म्हणायला सांगितल, पण तरी तीच लक्ष काही विचलित झाल नाही. मग मॅान्टेसरीने हळूच तिला उचललं आणि तिच्या खेळासकट एका टेबलवर नेऊन बसवलं, तरी ती पट्ठी काही बधली नाही.
हे पाद्री अनेकदा येताना त्याच्या सोबत मुलांसाठी काहीतरी खाऊ घेऊन यायचे, आज त्यांनी बिस्कीटचे पुडे आणले होते, सगळ्या मुलांना पुडे वाटून झाल्यावर ते त्या चिमुरडीच्या जवळ गेले आणि तिला एक पुडा दिला. पुडा मिळाल्याबरोबर तिने त्याचा आकार पहिला आणि ताबडतोब तो पुडा एका छोट्या गोलाकार छिद्रात सरकवून टाकला.
शंभर वर्षापूर्वी मॅान्टेसरीने आपल्याला हे शिकवलं कि लहान मुल हि बक्षीस, प्रमाणपत्र, पुरस्काराने नाही शिकत. जगाला समजण्याचा त्यांचा एक वेगळा दृष्टीकोन आहे, एक वेगळी नजर आहे. कुठल्याही लहान मुलाला बक्षीस किंवा लालूच नाही तर प्रोत्साहनाची जास्त गरज असते.
आनंदघरात कुठलीही गोष्ट वाटायची नाही हे तत्व आम्ही अगदी सुरुवातीच्या दिवसातच ठरवल आणि त्याला कारण देखील तसच होत. आनंदघर सुरु केल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काही दिवसात आम्ही सगळ्या मुलांना लिहिण्यासाठी पाट्या वाटल्या. पण ४/५ दिवसातच मुलांकडच्या पाट्या नाहीश्या होतायेत अस आमच्या लक्षात आल. मुलांना विचारल तेव्हा “हरवली”, “चोरीला गेली”, “तुटली” अस उत्तर मिळाल तर बाकीच्यांनी “विकून टाकली” अस अगदी स्पष्टपणे सांगून टाकल. मुलांना जोपर्यंत एखादी गोष्ट त्यांनी स्वतः कमावली आहे अस वाटत नाही तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टींसोबत हेच होणार हे आमच्या लक्षात आल. त्यामुळे यानंतर आनंदघरात कुठलीही गोष्ट उगाच वाटायची नाही हे ठरवल गेल. मुळातच कचरा वेचक मुल हि स्वावलंबी असतात. अगदी ५ वर्षाची छोटीशी चिमुकलीदेखील दिवसाला १५/२० रुपये सहज कमावते अश्यावेळी त्यांना उगीच आपल्यावरती अवलंबून करण योग्य नाही.
यानंतर जेव्हा आम्हाला मुलांना पेन द्यायचे होते तेव्हा आम्ही बाजारातून नुसत्या रिफिल्स आणल्या आणि डिंक तसच कागदाचा वापर करून पेन कसा तयार करायचा हे शिकवलं गेल. त्याप्रमाणे प्रत्तेकाने आपला पेन स्वतः तयार केला आणि नंतर पुढचा महिना जोपर्यंत त्यातली रिफील संपत नाही तोपर्यंत सगळी जण त्यांचा पेन घेऊन फिरत होती. याच कारण तो पेन त्यांनी बनवला होता, कमावला होता.
काही दिवसांनी जळगावातील एका स्थानिक क्लब आनंदघरातील मुलांना भेटायला आला होता. त्यांनी येताना प्रत्तेक मुलासाठी स्वतंत्र चित्रकलेची वही आणि स्केचपेन आणले होते. मुळात चित्रकलेच्या तासाला आनंदघरात प्रत्तेकाला एक-एक पान दिलं जात आणि छोटे गट करून एका गटासाठी काही स्केचपेन दिले जातात. संसाधनाचा वापर सहकार्याने करण्याची सवय मुलांना लागावी हा या मागचा हेतू आहे. कार्यक्रम संपवून पाहुणे गेल्यानंतर मुलांनी त्या वह्या आमच्या समोर आणून ठेवल्या. “एवढ्या गोष्टी आपल्याला एकावेळी लागत नाहीत. सगळं आपल्या कपाटात ठेऊ आणि लागतील तसे वापरू”. आनंदघरातील एकाही मुलाने त्या दिवशी वही आणि स्केच पेन घरी नेला नाही.
आज प्रत्तेक आनंदघरात साधारण २०० पुस्तकांचे वाचनालय आहे, प्रत्तेक ठिकाणी सुमारे रु.२५,००० पेक्षा जास्त किमतीचे खेळ आणि वस्तू आहेत, काही ठिकाणी LED टी.व्ही आहे. या सगळ्यांचे नियोजन मुलांकडे असते. एवढच नाही तर आनंदघराची एक चावी देखील मुलांकडे असते. मात्र आज इथून एकही वस्तू चोरीला जात नाही, हरवत नाही, तुटत नाही.
यालाच जोडून एक घटना जी कायम माझ्या लक्षात राहिली ती मला इथे सांगावीशी वाटते. जळगावातील एका वस्तीत आम्ही काही वर्ष मध्यंतरी ‘आनंदघर’ चालवलं मात्र नंतर जागेच्या अभावी आम्हाला ते बंद करावं लागलं. काही काळाने तिथे एका दुसऱ्या एका संस्थेने संस्कार केंद्र सुरु केलं. इथे मुलांना शिकवलं जात नाही तर फक्त पाहुण्यांना बोलवून केक कापायचा, अन्न वाटायचं असे कार्यक्रम करून त्याचे फोटो काढून बातम्या केल्या जातात. मध्यंतरी एका कामासाठी आम्ही वस्तीत गेलो. बऱ्याच काळाने गेलेलो असताना देखील सगळी मुलं एका मिनिटात जमा झाली आणि आम्हाला येऊन बिलगली. पालक गोळा झाले. आनंदघर परत चालू कराव अशी त्यांची इच्छा होती. तिथल्या संस्कार केंद्राच नाव घेऊन ते म्हणाले, ”दादा लोकं येता आणि नुस्त जेवण दि सन निघी जाता. आमच्या पोरांले काय खायला भेटत न्हायी काय? अम्हासले जेवण नकोय शिक्षण हवंय”. वस्तीपातळीवरील लोकांच्या संदर्भात आपले असलेले गैरसमज या एका वाक्यात संपायला हवेत. लोकांना इतरांवर अवलंबून जगण नकोय तर त्यांना स्वावलंबी बनवेल अस शिक्षण हवं आहे. त्यांना तुमचे जुने कपडे, शिळ अन्न, तुटलेली खेळणी नकोयेत तर मायेने जवळ घेऊन, हातात पाटी, पेन्सिल देणारं कोणतरी हवंय!
Comments
Post a Comment