कर के देखो
“लोकं येता, अन माहिती घी सन चालले जाता. पुढ कायबी होत नई.” २०१३ सालच्या कचरा वेचकांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणादरम्यान अनेकजण त्यांच्या मनातली सल बोलून दाखवत होते. त्यावेळी ही परिस्थिती बदल्यासाठी आपण काहीतरी करायला ही भावना आता मनात घर करायला लागली होती.
याच दरम्यान मी पहिल्यांदा जळगावातील मेहरूण परिसरातील छोटी भिलाटी या भागात गेलो. मुख्यतः कचरा वेचक, हात-मजुरी करणाऱ्यांची ही वस्ती. या वस्तीत अगदी मुख्य रस्त्याच्याकडेलाच मरीमातेचं एक मंदिर आहे. मरिमाता ही आदिवासी देवता. या मंदिराच्या परिसरात दररोज संध्याकाळी काही लोकं पत्ते खेळत बसलेली असायची. तिथेच बाजूला काही दारू पिऊन झोपलेले असायचे तर आजूबाजूची लहान मुलं काहीतरी खेळत असायची नाहीतर मस्ती, मारामारी करत असायची. पहिल्यांदा ज्यावेळी मरिमातेच्या मंदिरात मी गेलो त्यावेळी वाटलं, ‘अरे ही मस्त जागा आहे काहीतरी सुरु करण्यासाठी’ आणि मग एक प्रयोग सुरु झाला.
काय करायचं हे अजिबात माहिती नव्हत. त्यामुळे पहिल्या दिवशी मी laptop वर टॉम & जेरीच्या कार्टूनचे काही भाग आणि तारे जमीन पर मधलं बम बम बोले हे गाण असं डाऊनलोड करून घेऊन गेलो. माझ्यासोबत समाधान आणि समीर हे सर्वेक्षणादरम्यान ओळख झालेले कार्यकर्ते देखील होते.
मंदिरात गेल्यावर नेमही प्रमाणे पत्ते खेळणारे, दारू पिऊन झोपलेली लोकं आणि आजूबाजूला खेळणारी मुलं होतीच. तिथ जाऊन laptop उघडला आणि काहीतरी काम करायला बसलो. Laptop बघितल्या बघितल्या काही चिल्लीपाल्ली जवळ आली आणि “काय करी राहिला?” असं विचारलं. त्यांना सांगितल कि थोड काम करतोय. पोरं म्हणाली काहीतरी दाखवा ना. त्यांना म्हणालो, “बसा”. तिथल्याच एका पायरीवर laptop ठेवला आणि मुलांना आधीच डाऊनलोड करून आणलेले कार्टून आणि गाणी दाखवली. त्यानंतर आम्हाला काही करावच लागलं नाही. मुलांनीच त्यांच्या मित्र-मैत्रिणींना बोलवून आणायला सुरुवात केली आणि बघता बघता तिथं जवळपास ३० मुलं-मुली जमा झाले. थोड्या वेळाने जेव्हा निघालो त्यावेळी, “कालदी (उद्या) येणार का?” असा प्रश्न होताच म्हणल,”येतो की.” तर ते म्हणाले,” आमच्या दोस्तानले भी घी येता मंग.”
दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचलो तर पोरं आधीच जमा झालेली होती. “सर उना रे भो” (सर आले) असा आवाज वस्तीत सगळीकडे गेला. मुलांनी दुसऱ्याच दिवशी आम्हाला त्यांचे ‘सर’ करून टाकल होत. आज मात्र जवळपास ४५ मुलं-मुली होती. पुन्हा एकदा नवीन कार्टून, नवीन गाणी असा जवळपास तासभर घालवल्यावर आम्ही परत जायला निघालो, पुढच्या दिवशी परत यायला.
आता आम्ही रोजच मरीमातेच्या मंदिरात जायला लागलो होतो. Laptop वरच्या कार्टून आणि गाण्यांची जागा आता खेळ आणि भरपूर गप्पा यांनी घेतली होती. मुलं हळू-हळू खुलायला लागली होती. मुलांसोबत गप्पा मारताना लक्षात यायला लागलं होत की मुलांच्या आयुष्यात अश्या जागाच नाहीत जिथ ती मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतील.अशी लोकं नाहीत ज्यांच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकतील.
साधारण मध्यमवर्गातल्या मुलांचा दिवस कसा जातो याचा विचार करा. सकाळी हळुवारपणे कुणीतरी बेडवरून उठवत, आवरून होत नाही तर दुध-चहा-नाश्ता तयार असतो. शाळेत घेऊन जायला डब्बा भरून ठेवलेला असतो. संध्याकाळी आल्यावर मित्रांसोबत खेळायचं, अभ्यास करायचा. रात्रीच जेवण एकत्र करताना आजचा दिवस कसा गेला, शाळेत काय झाल, काय खेळलो याबद्दल गप्पा मारायच्या. याउलट वस्तीत काय होत? पहाटे पहाटे शिव्या घालतच कुणीतरी उठवत. घरात खायला असेल तर स्वयपाकात मदत करा. (शाळेत डब्ब्यात फक्त मुरमुरे आणले म्हणून शिक्षक वेगळी रांग करून बसवतात आणि इतर मुलं डब्बा खाताना बघायला सांगतात हे कधी ऐकलय? आम्ही ऐकलय). काही नसेल तर प्रश्नच मिटला. दिवसभर कामाच्या ठिकाणी, येता-जाता समाजाकडून शिव्या ऐका. घरी आलो की दारू पिऊन आलेल्या बापाने घातलेला गोंधळ किंवा आजुबाजूंची भांडण ऐकत झोपून जा. वयाच्या ५व्या वर्षापासूनच कामाला जुंपलेल्या मुलांना बालपण असं कधी नसतच. कळी कोमेजण्यासाठी खुलायला तर हवी. इथे तर कळीच उपटून फेकून दिलेली असते.
“तुझा दिवस कसा होता? काय केलंस आज? तुला काय बनायचं आहे?” असे प्रश्न मुलांनी कधी ऐकलेलेच नसतात. त्यामुळे मुलांसोबत गप्पा मारायला सुरुवात केल्यावर मुलं भरभरून बोलायला लागली. स्वतःबद्दल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल मनापासून कुठलाही आडपडदा न ठेवता सांगायला लागली. त्या मरिमातेच्या परिसरातच आम्ही रोज आता एक ऐवजी दोन तास थांबत होतो. मुलांना शिक्षकाची नाही तर त्यांच्या हक्काच्या ताई-दादांची गरज होती. “सर उना” आता “दादा उना” मध्ये बदललं होत.
मंदिराच्या बाहेर गाडी दिसली रे दिसली कि “दादा उना रे भो” अशी आरोळी जायची आणि इकडून तिकडून ५ मिनिटात पोरं मंदिरात जमा झालेली असायची. आल्या आल्या सगळ्यात आधी आम्हाला मिठी मारणार आणि मगच गप्पा सुरु.
आम्ही गोल करून बसायचो आणि गप्पा सुरु व्हायच्या. मांडीवर एक, एक जण डाव्या-बाजूने टेकून बसलेला तर कोणी उजव्या-बाजूने. कधीतरी मुलं यायची आणि एका कोपऱ्यात जाऊन सरळ झोपून जायची. आम्हाला मात्र असं का करतायेत हे कळायचंच नाही. मग लक्षात यायला लागलं कि पहाटे ५ वाजता उठून ७-८ तास काम करणारं ते चिमुकल शरीर दमून जात होत. पण मरिमातेच्या मंदिरातला दररोज भरणारा दोन तासाचा तो वर्ग मुलांना त्यांच्या हक्काची आणि सुरक्षित जागा वाटायला लागली होती. इथे मी झोपलो तरी कुणी मला मारणार नाही, रागावणार नाही याची मुलांना खात्री होती. आम्ही देखील मुलांना मग अगदी निघताना फक्त उठवून जायचो.
मरिमातेच्या मंदिरात काय सुरु आहे हे त्यावेळी सगळ्यांना बाहेरून अगदी व्यवस्थित दिसायचे. ही कोण पोरं आहेत जी रोज इथं येतायेत असं कुतूहलाने पालक देखील बघायला लागले होते. “आमच्या पोरास्ले नजदीक घी राहिनात, जीव लावी राहिनात” असं म्हणत आमच्याशी बोलायला लागले होते. इतकच नाही तर अधून मधून घरातल्या एखाद्या चिमुकल्याला उचलून आणून मंदिरात ठेवायचे आणि “हिलेबी घ्या” असं म्हणून जायचे.
पण सगळ्यांनाच हे आवडायचं असं नाही. काही लहान मुलं, तरुण मुलं उगीच तिथं येऊन दंगा घालायची. अधून मधून शिव्या ऐकू यायच्या. कधीतरी बाहेरून आमच्यावर काहीतरी फेकलं जायचं. पण मरिमातेच्या मंदिरात जे सुरु होतं ते नको असलेल्यांची संख्या, आम्ही तिथं पाहिजे यांच्यापुढे खूपच छोटी होती. आता मुलांच्या पालकांनी, वस्तीतल्या काही समजदार लोकांनी, इतकच काय तिथल्या कम्युनिटी लीडरने देखील आमच्या भोवती एक सुरक्षेच कुंपण घालायला सुरुवात केली होती.
खरतर काम सुरु करताना मुलांसोबत आपण काय करणार आहोत याची जराही कल्पना आम्हाला नव्हती. मुलांना द्यायला आमच्याकडे प्रेम, सहवेदना आणि आदर याशिवाय दुसरं काहीच नव्हत. मात्र मुलांना तरी दुसरी अपेक्षा काय होती? आमच्यातलं एकमेकांबद्दलच प्रेम आणि आदर यावर आता मरिमातेच्या मंदिरातला तो दोन तासाचा वर्ग खुलायला लागला होता.
Comments
Post a Comment