प्रश्न आणि प्रश्न
प्रश्न वस्तीतले… आम्ही जळगावातील एका वस्तीत काही माहिती गोळा करण्यासाठी फिरत होतो. दुपारची वेळ होती. अचानक बाजूच्या घरातून आरडाओरडा सुरु झाला. इतरांसाठी ही कौटुंबिक भांडणं हा कायमचाच भाग, पण आमच्यासाठी मात्र हे सगळचं नवीन होतं. थोड्याच वेळात घरात भांडणारे नवरा - बायको बाहेर आले. त्या ताईच्या हातात एक तान्ह बाळ होतं. नवऱ्याने प्रचंड दारू पिलेली होती. अचानक त्याने तिच्या हातातलं ते बाळ हिसकावून घेतलं आणि जमिनीवर फेकून दिलं. आता आजूबाजूचे लोकं त्याला पकडायला आणि बाळाला सांभाळायला धावले. काय घडतंय हे न समजण्यापलीकडे गेलेले आमचे पाय मात्र तिथेच थिजून गेले. सुदैवाने बाळाला काही झालं नव्हत. समाजातल्या या दुसऱ्या काळोख्या बाजूशी आमची पहिली ओळख होत होती. मुलांसोबत काम करायला सुरुवात करून काही दिवस झाले होते. आम्ही मुलांना शिकवत होतो आणि अचानक आनंदघरातला एक चिमुरडा धापा टाकतच आनंदघरात आला. प्रचंड रडत,’दादा लवकर घरी चाला. माह्या-बाप मायले मारी राहिलाय.’ त्याच्या बोलण्यात जी भीती होती ती बघून आम्ही पळतच त्याच्या घरी गेलो. आम्ही येतोय याची चाहूल लागलेला त्याचा बाप घरातून निघून गेला होता. त्या...