काही चित्र डोळ्यासमोरून जात नाहीत....





दि. १५ मे २०२०
वेळ: संध्याकाळचे ६:३०
स्थळ: इच्छादेवी चौफुली, जळगाव
प्रसंग १: साधारण ६० वर्षाचे म्हातारे गृहस्त पायी चालणाऱ्या सुमारे २० जणांच्या गटासोबत स्टोल समोर येऊन थांबले. चष्मा  तुटलेला. पायातली चप्पल निघत होती. खांद्यावर एक छोटी बॅग. हा माणूस नाशिक वरून निघाला होता. काही नंतर पायी तर काही नंतर मिळेल त्या गाडीने प्रवास करून जळगावपर्यंत पोहोचला होता.त्यांना गोंदिया जायचेय. सकाळपासून काहीही खाल्लेले नव्हते.
प्रसंग २: बाईक वर पुढे बॅग अडकवलेली. मागे बायको आणि दोघांच्या मध्ये ४-५ वर्षाचा पोरगा. रायगड वरून आदल्यादिवशी सकाळी ११ वाजता निघालेत. वाटेत नाशिकला ५ तास रस्त्यावरच कडेला मुक्काम केला आणि तिथून पुन्हा एकदा निघालेत. यांना जळगाव-जामोद जायचंय.

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काहीच दिवसात मुंबई,  पुण्यात अडकलेले असंख्य मजूर पायी आपल्या गावी  जायला निघाले. खिशात पैसे नाहीत, खायला अन्न नाही. खाद्यावर एक छोटी बॅग  आणि हातात पाण्यासाठी बाटली. १०००-१२०० किलोमीटर चा प्रवास यांनी पायी केला. काही दिवसापासून सरकारने ट्रक, बस मधून जायला यांना परवानगी दिली आणि तसे लाखोंच्या संख्येने मजूर गावी परतायला सुरुवात्त झाली आहे.
जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो. मुंबई, नागपूर, छत्तीसगड यांना हा मार्ग जोडतो. तर जळगाव शहर हे गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सिमेवरती वसलेला जिल्हा. गेल्या ४-५ दिवसात हजारो ट्रक दररोज या महामार्गावरून प्रवास करत जातानाचे चित्र दिसत आहे. एका एका ट्रकमध्ये किमान १०० जण कोंबलेले. वाटेत कुठेही खायला अन्न नाही, पाणी नाही. डोक्यावर तापणारा सूर्य अश्या अवस्थेत हि लोकं हजारो किलोमीटरचा प्रवास करत निघाले आहे.
काही दिवसापासून धुळ्यात मेधाताई पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काही संस्थांनी एकत्र येऊन दररोज सुमारे २०००० जणांच्या जेवणाची सोय केली आहे. याच धरतीवर जळगावातील काही संस्थांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठीकठिकाणी stall लावले आहेत. आमचे मित्र फिरोज भाई यांच्या जननायक फाऊनडेशन च्या माध्यमातून सुरु असलेल्या या stall वर आज मी संध्याकाळचा वेळ घालवला. रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकल थांबवून ते लोकांना जेवायला देतायेत. पाणी, टरबूज, चहा, खिचडी, पुरी-भाजी देऊन कोणीही उपाशी पुढे जाणार नाही याची काळजी घेतायेत. यावेळी बघितलेलं चित्र आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोरून जाणार नाही.
लोकांच्या डोळ्यामधली हतबलता, सगळ मागे सोडून आल्याचे दुख, आणि १/२ दिवसानंतर खायला मिळतंय याचा आनंद. काही वर्षापूर्वी हि लोकं कदाचित अशीच रिकाम्या हाती मुंबई, पुण्याला गेली असतील, पण त्यावेळी डोळ्यांमध्ये अनेक स्वप्न असतील. स्वतःची, कुटुंबाची गरज भागेल, उभ आयुष्य पाचवीला पुजलेलं दारिद्रय संपेल, हि आस असलेली हि असंख्य लोकं आज पुन्हा एकदा रिकाम्या हाताने घरी परत जातायेत.
“आम्हाला काहीच नकोय, आम्हाला आता फक्त आमच्या घरी जाऊद्या. जगलो तर जिवंत आणि मेलो तर शरीर” अशीच भावना जवळपास सगळ्यांची आहे.
काही दिवसापूर्वी जळगावातील एका १५ वर्षाच्या मुलीने घरात खायला अन्न नाही म्हणून आत्महत्या केली. आज शहरातली पोर पुन्हा एकदा घरी आली आणि आता खायची दोंड दोनची सहा झाली या चिंतेने एका बापाने आत्महत्या केली.
लॉकडाऊन, qurantine हा काहीसाठी मौजेचा विषय आहे मात्र करोडो लोकांसाठी हि न संपणारी चिंतेची साखळी आहे.
कोरोन संपेल, जग पुन्हा एकदा त्याच वेगाने पुढे सरकायला लागेल पण तुटलेल्या हजारो स्वप्नांची वीण पुन्हा एकदा जुळवण शक्य होईल कि नाही माहित नाही. हि वेळ घरी बसण्याची नाही तर हि वेळ आहे त्या लाखो मजुरांनी आणि प्रवाश्यांना धीर देण्याची, त्यांना सांगण्याची कि तुम्ही एकटे नाही. काही चित्र तुमच्या नजरेसमोरून जात नाहीत. पण हि वेळ आहे त्यांना सगळ्यांना सांगण्याची  कि आपण पुन्हा एकदा सगळे मिळून नवीन चित्र रंगवू...


Copyright: Adwait Dandwate


Comments

Popular posts from this blog

हे फोटोज का महत्त्वाचे आहेत????

आनंदघराचं ग्रंथालय

Why do these photos matter the most???