मैलोन मैल चालणारे पाय घराशी येऊन थबकतात तेव्हा...


गेल्या काही दिवसापासून जळगावातील आमचा मित्र दिपक याच्या भरारी फाउंडेशनच्या मदतीने आम्ही वस्तीतील महिलांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तुंच कीट वाटतो आहोत. गहू, तांदूळ, डाळ आणि तर काही वस्तू असलेलं हे कीट ४/५ जणांच्या कुटुंबाला सुमारे ५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा या कीटमध्ये उपलब्ध आहे. काही दिवसापूर्वी आम्ही सुमारे २५ जणांना हे कीट वाटले. तर काल रात्री पुन्हा एकदा ३० जणांना हे कीट देण्यात आले.
आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आमच्या घराचं गेट वाजलं. बाहेर जाऊन बघितल तर तांबापुरा परिसरातील ७ महिला दाराशी उभ्या होत्या. गेट उघडून सगळ्यांना आधी आत घेतल. काल कीट देताना काही जणी घरी नव्हत्या, त्यांना कीट मिळाल नव्हत. या सगळ्या महिला पायी चालत तांबापुराहून आमच्या घरी आल्या होत्या. ६०/६५ च्यावरती वय असलेल्या या सगळ्या अंदाजे ६-७ किलोमीटर ४० डिग्री तापमानात “दादांच्या घरी गेलो तर आपल्याला नक्की कीट मिळेल” असा विचार करून तिथून चालत आल्या होत्या.
“किमान फोन करायचा ताई आम्ही आलो असतो.” असे सांगतिले तर “तुमचा नंबर नव्हता. कुणाकडे काही मिळत नाही तर उगीच घरी आशा लावायला नको म्हणून आमही कुणाला न सांगता लगोलग निघालो.” असे उत्तर मिळाले.
परिस्थिती गंभीर आहे. मुलांना खायला अन्न नाही. येणाऱ्या गाडीमागे ताट हातात घेऊन मूल पळतायेत. अनेक संस्था कुठलाही स्वार्थ न ठेवता मदत करत आहेत पण त्याच वेळी मदतीच सोंग करणारे अनेक आहेत, वाटीभर खिचडी द्यायची आणि १० फोटो काढायचे, ४-४ तास बसवून ठेवायचं आणि २ किलो गहू, तांदूळ देऊन बोळवण करायची असे प्रकार सुद्धा अनेक ठिकाणी  सुरु आहेत.
सगळ्यांना घरात बसवलं. दिपकला फोन लाऊन तातडीने काही कीट arrange करता येतील का याची चौकशी केली. दिपक तातडीने ८ कीट्स घेऊन आला. या दरम्यान सगळ्यांना घरात बसवून प्रणाली आणि आई-बाबांनी पटकन खिचडी बनवली आणि खायला दिली.
“ताई दोन दिवसांनी आज जेवते आहे.”
“८ दिवस झाले व्यवस्थित खायला नाही, भूक मरून गेली असं वाटतंय.”
“पोरं विचारतात आये काही हाये का खायला तर आपण उरलेलं आपली भूक मारून त्यांना देऊन द्याव.”
सगळ्यांना मी आणि प्रणाली ने गाडी वर घरी सोडलं.
काही दिवसांपूर्वी कोरोन तर चीनमध्ये आहे असं वाटत असतानाच तो आपल्या देशात, राज्यात, शहरात येऊन धडकला. खायला अन्न नाही, पैसे नाही नाहीत म्हणून गावाला चालत निघालेली लोकं टीव्हीवर  बघतानाच आज मैलोनमैल चालणारी हि पावलं आमच्या दाराशी येऊन धडकली तेव्हा सुन्न व्हायला झाल.
१४ एप्रिलनंतर कदाचित lockdown आणखी वाढवला जाईल, कदचीत वाढवला जाणार नाही पण इथून पुढे किमान वर्ष/दोन वर्ष हि लढाई आपल्याला लढायची आहे. पुढील काही दिवसात आम्ही आणखी १५०किट्स ची सोय केली आहे आणि परत नवीन किट्ससाठी प्रयत्न करत आहोत.
भुकेने जीव जाण याहून वाईट दुसर मरण नाही. केंद्र आणि राज्य सरकार, टाटा आणि विप्रोसारख्या कंपनी मदत करणारच आहे पण तुम्हा, आम्हासारख्या मध्यमवर्गीय, ज्यांची किमान एका कुटुंबाला जेवण देण्याची क्षमता आहे त्यांनी जरी थोडा पुढाकार घेतला तरी खूप मोठी मदत उभी राहणार आहे.
एक लक्षात घ्या ह्या चालणाऱ्या पायांना थाबवून आश्वस्त करण्याची जवाबदारी आपलीपण आहे.  आपण सगळे मिळून या कठीण प्रसंगातून तरून निघू हिच प्रार्थना!!!

अव्दैत




Comments

Popular posts from this blog

हे फोटोज का महत्त्वाचे आहेत????

आनंदघराचं ग्रंथालय

Why do these photos matter the most???