आनंदघराचं ग्रंथालय
आनंदघराचं ग्रंथालय वाचन गंमत असते. वाचता येणाऱ्यांसाठी आणि नव्याने वाचायला शिकणाऱ्यांसाठीसुद्धा. वाचन शिकण्यासाठी प्रेरणा महत्वाची असते. पुस्तकं वाचनासाठीची प्रेरणा जिवंत ठेवतात. वस्तीबाहेरचे बरेच अनुभव जे मुलांपर्यंत येऊच शकत नाहीत, अशा अनुभवांपर्यंत मुलांना पोहोचवण्याचे काम पुस्तकं करतात. पुस्तकांसोबत शिकणं आणि शिकवणं दोन्ही मजेदार होतं. अलीकडेच आमच्या आनंदघरात ग्रंथालय आलंय. मुलांना आवडतील अशी खूप वेगवेगळी पुस्तके वर्गात नेली. मुलांसमोर पसरून ठेवली. प्रचंड उत्सुकतेने मुलांनी प्रत्येक एक पुस्तक बघितलं. ही पुस्तके आपण घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो हे कळल्यावर मुलांना खूप आनंद झाला. आम्ही सर्वांनी मिळून ग्रंथालयाची नियमावली बनवली. पुस्तकांची काळजी कशी घ्यायची याबद्दल चर्चा केली. देव- घेव कार्ड म्हणजे काय, ते का वापरायचं हे समजून घेतलं. लगेचच देव-घेव कार्ड बनवले. मुलं हळूहळू पुस्तकं घरी घेऊन जाऊ लागली. पुस्तकं नेताना आणि आणताना कार्डमध्ये न चुकता नोंद करू लागली. अप्रत्यक्षपणे ग्रंथालयाची प्रणाली मुलांच्या लक्षात आली. बरं, मग आता पुस्तक वाचलं तर ताईला त्यातल्या गमतीजमती सांगायला नकोत? पुस्